खेळण्यातील विमान ते प्रत्यक्ष विमानप्रवास
By Admin | Updated: July 15, 2014 00:02 IST2014-07-15T00:02:39+5:302014-07-15T00:02:39+5:30
‘आपल्याला एवढ्या लहान वयात विमानात बसायला मिळेल असे कधीही वाटले नव्हते. आतापर्यंत फक्त खेळण्यातील विमान पाहिले होते. त्यासोबत खेळताना विमानात बसल्यानंतर कसे वाटत

खेळण्यातील विमान ते प्रत्यक्ष विमानप्रवास
गोंदिया : ‘आपल्याला एवढ्या लहान वयात विमानात बसायला मिळेल असे कधीही वाटले नव्हते. आतापर्यंत फक्त खेळण्यातील विमान पाहिले होते. त्यासोबत खेळताना विमानात बसल्यानंतर कसे वाटत असेल याची कल्पना करीत होतो. पण ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेत भाग घेतला आणि थेट विमानप्रवास करण्याची संधी चालून आली. एवढेच नाही तर ज्यांना आतापर्यंत टीव्हीवर पाहिले होते आणि पेपरमध्ये ज्यांचे फोटो अनेक वेळा पाहतो त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. खरोखरच मी ‘लकी’ आहे,’ ही भावना आहे गोंदियाच्या प्रोग्रेसिव्ह शाळेतील अंकुश प्रमोद तिडके या विद्यार्थ्याची.
लोकमतच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्याला मोफत विमानप्रवासासह देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याची संधी लोकमतने उपलब्ध करून दिली होती. त्यात येथील शास्त्री वॉर्डातील गौर भवन चौकातील रहिवासी असलेला अंकुश प्रमोद तिडके भाग्यवान ठरला. गेल्यावर्षी तो सहाव्या वर्गात असताना त्याने या स्पर्धेत भाग घेतला होता. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून अंकुशची दिल्लीवारीसाठी निवड झाली. ही गोड बातमी त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना दिली तेव्हापासूनच तो अगदी हरखून गेला होता.
राज्यभरातील निवडक ३५ विद्यार्थ्यांपैकी एक ठरलेल्या अंकुशला या अनोख्या प्रवासाबद्दल आणि पंतप्रधानांच्या भेटीबद्दल बोलते केले तेव्हा त्याचा आनंद शब्दात व्यक्त करण्यापलिकडे होता. अंकुश सांगत होता, १० जुलै रोजी सकाळी ७ वाजता नागपूरच्या विमानतळावरून आमचे विमान दिल्लीच्या दिशेने हवेत झेपावले आणि आतापर्यंत दाटलेल्या उत्सुकतेसोबत अनेकांच्या पोटात भितीचा गोळाही उठला. विमान जसजसे हवेत ढगांच्या वर जात होते तशी ही भिती हळूहळू कमी झाली. जेव्हा विमान अवकाशात स्थिरावले तेव्हा उत्सुकतेपोटी अनेक जण खिडकीतून बाहेरचे दृष्य पाहू लागले. त्याचे सर्वांना मोठे कुतूहल वाटत होते. एव्हाना एकमेकांना कधीही न भेटलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील मुलांची चांगली गट्टी जमली होती. मग आळीपाळीने सर्वजण खिडकीतून बाहेरचे दृष्य डोळ्यात साठवत या सफरीचा आनंद घेत होते.
दिल्ली विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर देशाची राजधानी पाहण्याची संधी सर्वांना मिळाली. विशेष गाडीतून सर्व बालकांना दिल्लीतील सर्व प्रमुख स्थळांची सफर करविण्यात आली. शेवटी पंतप्रधानांची भेट घेण्याची वेळ आली त्यावेळी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. देशाचे पंतप्रधान आपल्याला भेटणार याचा मोठा अभिमान वाटत होता. ज्यांना आतापर्यंत टिव्हीवर पाहिले, पेपरमध्ये फोटो पाहिले ते प्रत्यक्षात आपल्या समोर असणार याचे नवल वाटत होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. त्यांनी आमची चौकशी केली. ‘कसे आहात’ म्हणून विचारले. आम्ही पण त्यांना नमस्ते केले. देशाच्या पंतप्रधानांचा थाट, त्यांची सुरक्षा व्यवस्था सर्वकाही पाहण्यासारखेच असते.
आमच्यासाठी हे क्षण आयुष्यातील अनमोल ठेवा ठरणार आहे, आणि हे केवळ ‘लोकमत’मुळे साध्य होऊ शकले, असे अंकुशने सांगितले. विमानाच्या आवाजाचा अंकुशला थोडा त्रासही झाला. शिवाय एका दिवसात दिल्लीची सफर झाल्यामुळे दगदगीने तो थकूनही गेला. त्यामुळे दोन दिवस तो शाळेत जाऊ शकला नाही. मात्र सोमवारी शाळेत जाऊन मित्रांना ही गंमत सांगण्याची उत्सुकता त्याला लागली होती.
अंकुशला मिळालेल्या या संधीचे त्याच्या आई-वडिलांनाच नाही तर त्याच्या शाळेलाही मोठे कौतुक वाटले. त्यामुळेच प्रोग्रेसिव्ह शाळेत त्याचा या अनोख्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. आपल्या शाळेचा मुलगा पंतप्रधानांना भेटायला जातो याचा अभिमान शाळेच्या सर्व शिक्षकवृंदांसह विद्यार्थ्यांनाही असल्याचे शाळेचे संचालक कटकवार यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)