आचारसंहिता शिथिल होताच विकासकामांना आला ऊत
By Admin | Updated: May 13, 2014 23:38 IST2014-05-13T23:38:07+5:302014-05-13T23:38:07+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता २५ एप्रिलपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पेंडिंग पडून असलेल्या विकासकामांना पुन्हा ऊत आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे

आचारसंहिता शिथिल होताच विकासकामांना आला ऊत
गोंदिया : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता २५ एप्रिलपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पेंडिंग पडून असलेल्या विकासकामांना पुन्हा ऊत आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोठे भूमिपूजन तर कोठे लोकार्पण या कामांत विद्यमान जनप्रतिनिधींचे शेड्यूल व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्वच विभागातील विकासकामांना, बैठकींना बंदी घालण्यात आली होती. राज्यात तीन टप्यांत मतदान घेण्यात आले. त्यानुसार २४ एप्रिल रोजी राज्यातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल, हे अपेक्षित होते. यानुसार २५ एप्रिल रोजी राज्यातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली. मात्र आता राज्यातील आचारसंहिता शिथिल झाल्याने पुन्हा नेत्यांचे फावले आहे. त्याचे असे की, लोकसभेच्या निवडणुका तर सरल्या चार महिन्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. अशात विद्यमान व भावी आमदार आपली तयारी करण्यास मुक्त झाले आहेत. विद्यमान आमदार आता आपल्या निधीतील विकासकामे सुरू करून क्षेत्रातील मतदारांना इम्प्रेस करू शकणार तर भावी आमदार जनसंपर्क करून आपणही रिंगणात असल्याचे मतदारांना सांगू शकतील. त्यामुळे सर्वत्र नेतेमंडळींची लगबग दिसून येत आहे. सध्या या नेतेमंडळींना एक मुद्दा चांगला मिळाला आहे. तो म्हणजे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा. राज्य शासनाने शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने शेतकर्यांचे हितैशी धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत आहेत. तर काही आंदोलनाचा नगाडा पिटत आहेत. शिवाय विद्यमान आमदारांनी पेंडिंग पडून असलेल्या विकास कामांना पुन्हा सुरूवात केली आहे. भूमिपूजन व लोकार्पण सध्या जोमात सुरू आहेत. शहरातही विकास कामे जोमावर सुरू झाली आहेत. शहरातील कित्येक भागांतील रस्ते दुरूस्ती सुरू झाली आहे. नेहरू चौक, आंबेडकर चौक, मामा चौक, बाजार भाग यासह सुमारे सर्वच भागांत कामे केली जात आहेत. यावरून सध्या विकासकामांना ऊत आल्याचे दिसून येते. मात्र मतदार आता शहाणा झाला आहे. हे सर्व कशासाठी हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. (शहर प्रतिनिधी)