सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST2021-09-24T04:34:28+5:302021-09-24T04:34:28+5:30
गोंदिया : सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्या त्वरित मार्गी लावा अशी मागणी करीत जनतेची पार्टीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी, ...

सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा ()
गोंदिया : सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्या त्वरित मार्गी लावा अशी मागणी करीत जनतेची पार्टीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी, एसडीओ व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनातून ई-पीक पाहणी ॲपमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत असून शेतकऱ्यांकडे अँड्राईड मोबाईल नसल्याने ई-पीक पाहणी करणे शक्य नाही. तसेच एका मोबाईलवरून फक्त २० ही शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहू शकतात. यावर सुधारणा करून नोंदणी संख्या वाढविण्यात यावी. शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेतर्फे सहयोग करण्यात यावे. युरियाचा भरघोस पुरवठा व्हावा यासाठी कृषी केंद्रावर शासनाने कडक नियंत्रण ठेवावे. शासकीय धान खरेदी केंद्रात कोणत्याही केंद्रावर तालुकाअंतर्गत शेतकऱ्यांना धान विक्री करण्याचे अधिकार द्यावेत. ज्या रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळत नाही अशांना धान्याच्या पुरवठा व्हावा व त्यासाठी योग्य कार्यवाही करावी. पेट्रोल-डिझेल जीएसटीत समाविष्ट करावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व प्रपत्र-ब यादीतील लाभार्थींचे घरे पूर्ण झाले असून त्यांना उरलेली रक्कम त्वरित त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. घरगुती वीज बिलाचे दर कमी करण्यात यावेत. प्रलंबित कृषी पंप जोडणी त्वरित करावी. शेतकऱ्यांचे शेतीचे थकित वीज बिल माफ करावे. ओबीसी वर्गाला संविधान तरतुदीनुसार २७ टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर जागेत मिळावे. कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना जनतेची पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाऊराव उके, सचिव टिटुलाल उके, कोषाध्यक्ष मुनेश रहांगडाले, उपाध्यक्ष सुजीत येवले, ग्रामीण तालुकाध्यक्ष छत्रपाल तुरकर, शहराध्यक्ष कशिश जायसवाल, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन गौतम, मेहतर पगरवार, अजित टेंभरे, कमलेश सोनवाने, चैतालीसिंह नागपुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.