दुकान बंद, व्यापार बंद, मगर भीड रास्तेपर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:14+5:302021-04-10T04:28:14+5:30
गोंदिया : ‘दुकान बंद, व्यापार बंद मगर भीड रस्तेपर’ हा कसला लॉकडाऊन आहे. यह खाेकले लॉकडाऊन का हम विरोध ...

दुकान बंद, व्यापार बंद, मगर भीड रास्तेपर ()
गोंदिया : ‘दुकान बंद, व्यापार बंद मगर भीड रस्तेपर’ हा कसला लॉकडाऊन आहे. यह खाेकले लॉकडाऊन का हम विरोध करते है, असे फलक हातात घेऊन शुक्रवारी (दि. ९) सकाळी गोंदिया शहरातील व्यापाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली.
राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. यात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; मात्र, हा निर्णय घेत असताना शासन आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेताच नवीन निर्बंध लागू केले. त्यामुळे उद्योगधंदे संकटात आले असून, यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांचा रोजगार बुडाला आहे. एकीकडे शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवली आहेत; पण दुसरीकडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये कोरोना येत नाही काय? तो काय? केवळ कपड्याच्या आणि इतर दुकान येतो, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. नवीन निर्बंधांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्येसुद्धा संभ्रमाचे वातावरण आहे. सरसकट दुकाने बंद ठेवण्याऐवजी काही कालावधी निश्चित करून ती पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. मागील वर्षीदेखील कोरोनामुळे तब्बल तीन महिने दुकाने बंद होती. त्यामुळे अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले, कामगारांचा रोजगार गेला, वीजबिल, कर्जाचे हप्ते भरण्याची समस्या निर्माण झाली. यातून कसेबसे सावरत असताना आता पुन्हा व्यवसाय बंद झाल्याने व्यापारी व यावर अवलंबून असलेले कामगारसुद्धा संकटात आले आहेत. त्यामुळे शासनाने आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करून निर्बंध शिथिल करण्याची मागणी संजय जैन, आशिष मेठी, रमेश टहलानिया, अजय खंडेलवाल, गोटू जैन, राजेश लुनिया, सुनील अजमेरा, अर्जुन अजमेरा यांनी केली आहे.
.....
आता कर्ज काढून जगायचे काय?
मागीलवर्षी कोरोनामुळे तीन ते चार महिने दुकाने बंद होती. त्यामुळे व्यापार आधीच डबघाईस आला आहे. त्यातच नवीन निर्बंध लागू करून २५ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे व्यापाऱ्यांनी देणी कशी फेडायची, कामगारांना वेतन कसे द्यायचे, आता पुन्हा कर्ज काढून जगायचे काय? असा सवाल शहरातील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.
..........
कोट :
शासनाने काढलेल्या प्रत्येक निणर्याला व्यापाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केले आणि यापुढेदेखील सहकार्य केले जाईल. मात्र नवीन निर्बंध लागू करताना शासन आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता सरसकट निर्बंध लागू केले. हे निर्बंध शिथिल करून नियमांचे पालन करून दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची आमची मागणी आहे.
- बलराज कुंगवानी, अध्यक्ष, कपडा असोसिएशन.
......
मागील दोन-तीन महिन्यांपासून उद्योगधंद्यांची गाडी कशीबशी रुळावर आली होती. त्यातच आता नवीन निर्बंध लागू केल्याने पुन्हा व्यापार डबघाईस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- अर्जुन अजमेरा, व्यापारी.
....