अत्याचार करून तिला जिवंत जाळले?

By Admin | Updated: August 23, 2015 00:09 IST2015-08-23T00:09:56+5:302015-08-23T00:09:56+5:30

घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत १८ वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आल्या, ...

She was burnt to death by torturing her? | अत्याचार करून तिला जिवंत जाळले?

अत्याचार करून तिला जिवंत जाळले?

युवतीची हत्या : एकतर्फी प्रेमातून घडल्याचा नातेवाईकांचा आरोप
गोंदिया : घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत १८ वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आल्या, त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात मृत तरूणीच्या नातेवाईकांनी संशयित आरोपीची माहितीही पोलिसांना दिली, पण पोलिसांनी वृत्त लिहीपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.
सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनारटोला येथील आरती रविंद्र बारसे या तरूणीचा मृतदेह घराजवळील सरकारी विहीरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाला अनेक कंगोरे असूनही पोलिसांकडून तपासकामात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
आरतीच्या आईवडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, गावातीलच तंटामुक्त अध्यक्ष योगराज उर्फ मुन्ना हेमराज चकोले (२८) याने सहा महिन्यापूर्वी आरतीला प्रपोज केले होते. नेहमी तिच्या मागे-मागे जाऊन तो तिला त्रास द्यायचा. आईवडीलांनी या संदर्भात सालेकसा पोलिसात तक्रार केली, परंतु पोलिसांनी गुन्हा न दाखल करता तंटामुक्त समितीतून समझोता करा, असे सांगितले. त्यावर गावगाड्यातून त्या प्रकरणावर समझोता करण्यात आला. शंभर रुपयांच्या स्टँम्पवर योगराजने मी आता यानंतर आरतीला त्रास देणार नाही असे लिहूनही दिले होते. परंतु तो मुद्रांक आरतीला न देता पोलीस नायक विनायक बेदरकर याने स्वत:कडे ठेवला. आता तो काही करणार नाही याची जबाबदारी आमची राहील असे बेदरकर याने म्हटले होते. तरीही या समझोत्यानंतर मुन्ना आरतीला त्रास द्यायचा.
या संदर्भात आरतीने आपल्या मेहुणीला व मैत्रिणीला माहिती दिली होती. माझी बायको बण, असे तो नेहमी तिला बोलून त्रास द्यायचा. आरतीचे वडील रायपूर येथे एका कंपनीत कामाला आहेत. आरतीची मोठी बहिणही रायपूरला आहे. घटनेच्या आठ दिवसांपूर्वी आरतीची आई मोठ्या मुलीला तिच्या सासरी सोडून देण्यासाठी व पतीची भेट घेण्यासाठी गेली. घरी भाऊ संजय व आरती दोघेच असल्याने गावातच असलेल्या अनिल वानखेडे या मामाकडे राहायला गेले. गावातच मामाचे घर असल्याने स्वत:चे घर झाडून काढण्यासाठी आरती स्वत:च्या घरी जायची.
१८ आॅगस्टच्या दुपारी ४ वाजता ती मामकडेच होती. यावेळी तिच्या आईचे मामा आले असताना त्यांच्याशी ती बोलली. त्यानंतर तिच्या आईचे मामा गावातच एका वृध्दाला पाहण्यासाठी गेले. त्यानंतर आरती मामाच्या घरून स्वत:च्या घरी झाडू लावण्यासाठी व घरचे काम करण्यासाठी गेली. यावेळी तिच्यावर बळजबरी करून रॉकेल टाकून तिला जाळण्यात आले. त्यानंतर मृतदेह हाती लागू नये म्हणून विहीरीत टाकण्यात आला, असा संशय व्यक्त केला जात आहे.
रोवणी करून शेतातून परतलेली आरतीच्या आईची मावशी कलाबाई डिब्बे ही आरतीच्या घरी तिचे लुगडे घ्यायला गेली असताना घरात ठिकठिकाणचे कपडे जळाले दिसले. आरतीची ओढणी स्टूलवर ठेवली होती. त्यामुळे घाबरलेल्या कलाबाईने आरतीला हाका दिल्या असता तिचा कुठेच थांगपत्ता नव्हता. ती बहिणलेक अनिल वानखेडे यांच्या घराकडे गेली. लगेचच नातेवाईक त्या ठिकाणी हजर झाले. गावकरीही आले. त्यांनी रात्री १० वाजतापर्यंत शोधाशोध केल्यावरही आरतीचा पत्ता लागला नाही.
पोलीस पाटील देवाटोला यांना माहिती देण्यात आली. पोलिसांना सूचना देण्यात आली, परंतु पोलीस आलेच नाही. आरतीच्या घराजवळच शासकीय विहीर असल्याने ती विहीरीत तर नाही असा संशय नातेवाईकांना आला. गळ टाकून विहीरीत पाहिले असता तिचा मृतदेह गळाला लागला. पोलिसांनी १९ आॅगस्ट रोजी मृतदेहाचा पंचनामा केला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: She was burnt to death by torturing her?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.