मालिजुंगा परिसरात रेतीचा उपसा सुरूच
By Admin | Updated: February 12, 2016 02:13 IST2016-02-12T02:13:52+5:302016-02-12T02:13:52+5:30
परिसरातील मालीजुंगा येथील नाल्यातून रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. या प्रकाराकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा मात्र लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे.

मालिजुंगा परिसरात रेतीचा उपसा सुरूच
वन विभागाचे दुर्लक्ष : शासनाच्या महसुलावर गदा
पांढरी : परिसरातील मालीजुंगा येथील नाल्यातून रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. या प्रकाराकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा मात्र लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. यावर कठोर कारवाई केल्यास शासन होणाऱ्या नुकसानापासून बचावणार असल्याचे परिसरात बोलले जात आहे.
मालिजुंगा नाल्यात आजघडीला मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. मात्र रेतीघाटांवर बंदी असल्याने माफीया अवैधरित्या या नाल्यातून रेतीचा उपसा करीत आहेत. या नाल्यातील रेती कोसमतोंडी, मुरपार, लेंडेझरी, धानोरी येथे वाहतूक करून पाठविली जात आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका बसून आहेत. यामुळे रेतीमाफीयांचे मनसुबे बळावले असून रेती उपसण्याचा कारभार बिनधास्तपणे सुरू आहे.
रेतीचा अवैध उपसा होत असल्याने शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांच्या आर्शिवादानेच हे काम सुरू असल्याचेही नागरिक आता बोलत आहेत.
या प्रकाराला गांभीर्याने घेत जिल्हाप्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा शासन महसूलपासून वंचीत राहणार. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जनता करीत आहे. (वार्ताहर)