अर्जुनी मोरगाव : स्थानिक मीरानगरीत घराचे बांधकाम करीत असताना प्रवेशद्वाराजवळ मुरुमाचा उंचवटा तयार केल्याने गटार बुजले. यामुळे घराघरातील पाणी रस्त्यावर तुंबत आहे. नगरपंचायतीकडे तक्रार करूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मीरानगरी ही भरगच्च वस्ती आहे. नगरपंचायतीने गटारे तयार केलीत. मात्र, घराचे बांधकाम करताना काही लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर मुरुमाचा उंचवटा तयार करतात. यामुळेच नाली बुजते. जिथे नाली बुजली तिथे घराघरातील सांडपाणी तुंबते. एवढेच नव्हे तर गटारात अधिक पाणी गोळा झाल्याने त्याला वाहून जाण्यासाठी मार्ग सापडत नाही व ते रस्त्यावर साचून असते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याची यात भर पडते. पाणी अधिक झाल्याने रस्त्याने ये-जा करताना त्रास होतो. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. सांडपाणी आरोग्याला हानिकारक असल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती निर्माण होते. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बुजलेले गटार तातडीने दुरुस्त करण्याची मागणी मीरानगरवासीयांनी केली आहे.