लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 20:21 IST2019-05-04T20:20:21+5:302019-05-04T20:21:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा केला जात असताना आणि शासकीय सुटी असल्याचा फायदा ...

लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचा उपसा
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा केला जात असताना आणि शासकीय सुटी असल्याचा फायदा घेत रेतीमाफियांनी तालुक्यातील लिलाव न झालेल्या रेती घाटातून रेतीचा उपसा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तालुक्यातील कोदामेडी येथील स्मशानभूमी जवळील चुलबंद नदीच्या पात्रातून सर्रासपणे रेती माफीया रेतीचा उपसा करीत असल्याचे चित्र आहे. महसूल विभागाकडून रेती घाटांचा लिलाव केला जातो. अनेक जण लाखो रुपये खर्चून रेती घाट घेतात. मात्र महसूल विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून घाट घेणाऱ्यांना सुद्धा आर्थिक फटका बसत आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाचे कर्मचारी काही विशिष्ट लोकांना टार्गेट करुन त्यांचीच वाहने पकडतात. दुसरीकडे लिलाव न झालेल्या रेतीघाटावर जेसीबी लावून रेतीचा अवैधपणे उपसा केला जात आहे.
सध्या तालुक्यातील कोदामेढी, परसोडी, वळेगाव, बुद्धनगर, (घाटबोरी तेली, कोहळीटोला) कोहमारा, सिंदीपार, पळसगाव, पिपरी या घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे.
आतापर्यत तालुक्यातील एकाच रेती घाटाचा लिलाव झाला आहे. काही रेतीघाटांवरुन रेतीचा अवैध उपसा होत असल्यास निश्चित कारवाई केली जाईल.
-उषा चौधरी,
तहसीलदार सडक अर्जुनी
या मार्गाने कधी वाहन वाळूची वाहतूक करताना ही दिसत नाही. रेतीची अवैध वाहतूक करताना आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल.
-के.आर.सांगोळे ,
तलाठी ग्राम परसोडी