नियमबाह्य पद्धतीने शाळा व्यवस्थापन समिती गठित
By Admin | Updated: August 1, 2014 00:21 IST2014-08-01T00:21:40+5:302014-08-01T00:21:40+5:30
रावणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोंडीटोला येथील शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षक जे.जे. हटवार यांनी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीला

नियमबाह्य पद्धतीने शाळा व्यवस्थापन समिती गठित
रावणवाडी : रावणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोंडीटोला येथील शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षक जे.जे. हटवार यांनी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीला व पालकांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. तसेच त्यांना कसलेही महत्व न देता स्वहितासाठी आपल्या मर्जीतील पालकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या शाळा व्यवस्थापन समिती गठित केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हे राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांना लागू आहे. या अभियानाच्या माध्यमातून वर्गखोल्या, ग्रंथालये, प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य, विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम, विशेष गरजा असणाऱ्या मुला-मुलींसाठी सोयी-सुविधा या माध्यामतून उपलब्ध होत आहेत. माध्यमिक शाळांसह शासकीय अनुदानित माध्यमिक शाळेचे शिक्षक मुख्याध्यापकांना या अभियानांतर्गत प्रशिक्षित केले जात आहेत. या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शासकीय प्रयत्नांना लोकपाठबळाची गरज आहे. त्यासाठी शासकीय माध्यमिक शाळेत व्यवस्थापन आणि विकास समित्या स्थापन करण्याचे दिशानिर्देश शासनाच्या संबंधित विभागाचे आहेत. शिक्षा अभियानाची अंमलबजावणी शाळा पातळीवर व्यवस्थापन व विकास समितीकडे आहे.
शाळा व्यवस्थापन व विकास समितीच्या सभेत विचार मंथनातून शाळेच्या गुणवत्ता विकासाला दिशा मिळेल, त्यासाठी सदस्यांच्या बैठकामधील सक्रिय सहभाग मोलाचा ठरेल. त्यामुळे अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी व्यवस्थापन व विकास समित्यांना सोपविण्यात आली आहे.
मात्र येथील शिक्षक जे.जे. हटवार यांनी नियमबाह्य पद्धतीने समिती स्थापन केल्यामुळे गावातील पालकांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही गठित करण्यात आलेली शाळा व्यवस्थापन समिती रद्द करून नव्याने गठित करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)