विलगीकरणाची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST2021-04-21T04:29:16+5:302021-04-21T04:29:16+5:30
नवेगावबांध : येथील जिल्हा परिषद शाळेत गृहविलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गृहविलगीकरणातील व्यक्तींनी बाहेर पडू नये; अन्यथा गुन्हा दाखल ...

विलगीकरणाची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेत
नवेगावबांध : येथील जिल्हा परिषद शाळेत गृहविलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गृहविलगीकरणातील व्यक्तींनी बाहेर पडू नये; अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा ग्राम कोरोना समिती नवेगावबांधने ग्रामवासींना दवंडीद्वारे दिला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गावात झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण रुग्णालय, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, नवेगावबांध, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, बोंडे येथे ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देणे सुरू आहे. ग्रामवासीयांनी स्वत:चे लसीकरण करून घ्यावे. अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधावा, अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापनांनी सामाजिक अंतराचे पालन करुन सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबण व पाण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना करण्यात आली आहे, तसेच ज्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत आहे, त्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ग्राम कोरोना समितीचे अध्यक्ष सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी नागरिकांना केले आहे. घरी जागा नसल्यास जिल्हा परिषद हायस्कूलजवळील प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे गावातील कोरोनाबाधित नागरिकांची विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. बाधितांची अंथरूण व जेवणाची व्यवस्था बाधित व्यक्तींच्या कुटुंबीयांनी करावयाची आहे. गावातील कोरोनाबाधित व्यक्तीने विलगीकरणात असताना १४ दिवस बाहेर फिरू नये. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. बाधित रुग्ण गावात फिरताना आढळल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दंड आकारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.