आम्हाला आमच्या मूळ गावी पाठवा ! नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील परिसरात गावकऱ्यांचे आंदोलन
By अंकुश गुंडावार | Updated: December 4, 2025 18:57 IST2025-12-04T18:55:05+5:302025-12-04T18:57:30+5:30
Gondia : तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायत येथील पुनर्वसित सर्व नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या विरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकारगोंदी या मूळ गावी परत जाण्याचा ठाम निश्चय केला होता.

Send us to our native village! Villagers' protest begins in the area of Navegaon Tiger Reserve
सडक अर्जुनी : तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायत येथील पुनर्वसित सर्व नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या विरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकारगोंदी या मूळ गावी परत जाण्याचा ठाम निश्चय केला होता. ठरल्याप्रमाणे श्रीरामनगरवासी कोसमघाट ,मनेरी मार्गे व्याघ्र प्रकल्पातील कालीमाती गवत कुरण परिसरात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही ,असा पवित्रा श्रीरामनगरवाशी यांनी घेतला आहे.
यावेळी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा वन अधिकारी पवनकुमार जोंग यांनी नागरिकांना एक महिन्यात काही मागण्या शासन दरवाढ लावून मार्ग काढून गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा पवित्र घेतला आहे.
कालीमाती, कवलेवाडा , झलकारगोंदी ह्या गावातील नागरिकांच्या अनेक रास्त मागण्या शासनाच्या माध्यमातून पूर्ण न झाल्यामुळे आज ४ तारखेला आपल्या स्वगावी जाण्याचा निर्णय घेतला होता. अंदाजे दहा ते बारा ट्रॅक्टर घेऊन, आपल्या परिवारांसोबत कालीमाती गवतकुरण परिसरात पोहोचले. सायंकाळी स्वतः जेवणाची व्यवस्था करून अंदाजे तीनशे श्रीरामनगरवाशी तंबू लावून निर्णय होईपर्यंत ,कालीमाती गवतकुरण परिसरात ठिया मांडून राहण्याचा पवित्रा घेतला आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या पूर्ण बारदानासह श्रीरामनगरवाशी कालीमाती गवत कुरण परिसरात पोहोचले.
यावेळी गोंदियाचे उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग , नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, उपविभागीय वन अधिकारी दुर्गे ,नवेगाव - नागझीरा व्याघ्र प्रकल्पाचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके, बोंडेचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मगर, वनपरिक्षेत्र अधिकारी सूर्यवंशी, सडक अर्जुनी तहसीलदार, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे थानेदार गणेश वणारे, वनविभाग, वन्यजीव विभागाचे व पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंतर्गत रस्ते केले वनविभागाने बंद
कोसमघाट गावात जवळून व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव कर्मचाऱ्यांना जाण्यासाठी असलेल्या मार्गावरून श्रीरामनगरवाशी कालीमाती गवत कुरण परिसरात पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली. सायंकाळी तीन वाजता जेसीबी चे माध्यमातून रस्त्यावर आडवी नाली करून रस्ते बंद करण्यात आले.