लाखो रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यातच
By Admin | Updated: July 16, 2015 01:46 IST2015-07-16T01:46:38+5:302015-07-16T01:46:38+5:30
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेले गोंदिया रेल्वेस्थानक तीन राज्यातील प्रवाश्यांसाठी महत्वाचे स्थानक मानल्या जात आहे.

लाखो रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यातच
आगीसाठी प्रभावी उपाययोजना नाहीत
गोंदिया : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेले गोंदिया रेल्वेस्थानक तीन राज्यातील प्रवाश्यांसाठी महत्वाचे स्थानक मानल्या जात आहे. या स्थानकावरून दररोज १०५ प्रवाशी गाड्यांची वर्दळ असते. परंतु सुरक्षेच्या दृष्ट्रीने या ठिकाणी आग लागल्यास त्वरीत विझवता येईल अश्या ठोस उपाय योजना रेल्वेकडे सद्या उपलब्ध नाहीत. आगीपासून संरक्षण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उदासिन आहे.
गोंदिया रेल्वे स्थानक आगीसारख्या घटनांशी सामना करण्यास खरोखरच सज्ज आहे का? याबाबत माहिती काढली असता या रेल्वे स्थानकाच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. गोंदिया रेल्वे विभागात १५ उपविभाग आहेत. या प्रत्येक विभागात छोटे अग्निशमन यंत्र उपलब्ध आहे. कोणत्या कार्यालयात एक तर कोणत्या कार्यालयात दोन यंत्र उपलब्ध आहेत. सहायक स्टेशन मास्तर, स्टेशन मास्तर, रिजर्वेशन आॅफिस, बुकिंग आॅफिस, पार्सल आॅफिस, गॅरेज आॅफिस, गुडशेड, मालधक्का या प्रत्येक ठिकाणी छोटे अग्निशमन यंत्र आहे. ड्राय केमिकल पावडर असलेले यंत्रही असल्याचे सांगितले जाते. याशिवाय प्रत्येक फलाटावर फायर स्टॅण्ड लावण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकाजवळ ३ पाण्याच्या टाक्या आहेत.
भिषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अभियंत्याकडे पाईपची व्यवस्था असली तरी वेळीच आगीवर नियंत्रण आणण्यासाठी वॉशिंग लाईनची मदत घेता येईल अशी कोणतीही उपाय योजना रेल्वेकडे उपलब्ध नाही. प्रत्येक गाडीमध्ये दोन अग्निशमन यंत्र पुर्वीचेच उपलब्ध असतात. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे विभाग उदासिन असल्याचे लक्षात येते.
या रेल्वे स्थानकाच्या तिकीट घरातून दररोज ३२ हजार व्यक्ती तिकीट काढतात. मासिक, त्रैमासिक, पासधारकांचीही संख्या अधिक आहे. याशिवाय आरक्षण करून प्रवास करणारे प्रवाशी लाखो लोक गोंदिया रेल्वे स्थानकावरून आवागमन करीत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकतो.
कोट्यवधीचे महसूल देणाऱ्या रेल्वेस्थानकावर आग लागल्यास त्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे विभागाकडे सक्षम उपाय योजना नाही. किरकोळ आगीवर नियंत्रण आणता येऊ शकते. परंतु मोठ्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे विभागाला बरिच कसरत करावी लागेल. ( तालुका प्रतिनिधी)