सावित्रीच्या लेकींनी आत्मनिर्भर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST2021-01-25T04:30:31+5:302021-01-25T04:30:31+5:30

अर्जुनी-मोरगाव : स्त्री ही सर्व शोधाची जननी आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःला कमजोर समजू नये. महिला अबला आहेत, हा ...

Savitri's lakes should be self-sufficient | सावित्रीच्या लेकींनी आत्मनिर्भर व्हावे

सावित्रीच्या लेकींनी आत्मनिर्भर व्हावे

अर्जुनी-मोरगाव : स्त्री ही सर्व शोधाची जननी आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःला कमजोर समजू नये. महिला अबला आहेत, हा कलंक पुसून आम्ही सबला आहोत ही ताकद निर्माण करण्याची वेळ आली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला शिक्षणाचे बाळकडू पाजले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना संविधानाच्या माध्यमातून सर्व अधिकार प्राप्त करून दिले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात महिलांनी विविध क्षेत्रांत प्रगती केली आहे. स्त्रिया मोठ-मोठे पदे भूषवित आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला संसार सुखाने करू लागल्या आहेत. स्त्रियांनी कुठलाही अन्याय सहन न करता तेवढ्याच ताकदीने अन्यायाचा प्रतिकार करावा व आत्मनिर्भर व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले.

तालुक्यातील मोरगाव (अर्जुनी) येथील ग्रामपंचायत भवनाजवळ आयोजित महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच विजया उईके होत्या. सहउद्घाटक म्हणून अर्जुनी-मोरगाव नगरपंचायत मुख्याधिकारी शिल्पा राणी जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी सेविका शीला लाडे, छाया लोधी, कल्पना लाडे, त्रणिषा शहारे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष मंजूषा तरोणे, विद्या शहारे, चंद्रकला वलके, अस्मिता भुरे उपस्थित होत्या.

सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून हळदी-कुंकू व महिला मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी जाधव यांनी महिलांनी आपल्या मनात मोठे उद्दिष्ट ठेवून स्वयंप्रकाशित व्हावे. आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवावे असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिलांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या वैशाली खोब्रागडे यांनी केले. तर ग्रामपंचायत सदस्य सोनू कराडे यांनी आभार मानले. याप्रसंगी उपस्थित महिलांना हळदी-कुंकू व वाण वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Savitri's lakes should be self-sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.