सरस्वती विद्यामंदिरला सील
By Admin | Updated: March 13, 2015 01:51 IST2015-03-13T01:51:27+5:302015-03-13T01:51:27+5:30
कर वसुली मोहिमेत असहकार्य करून कर भरण्यास नकार दिल्याने गोंदिया न.प.च्या वसुली पथकाने बाजपेयी वॉर्ड, पिंडकेपार रोडवरील ....

सरस्वती विद्यामंदिरला सील
गोंदिया : कर वसुली मोहिमेत असहकार्य करून कर भरण्यास नकार दिल्याने गोंदिया न.प.च्या वसुली पथकाने बाजपेयी वॉर्ड, पिंडकेपार रोडवरील सरस्वती विद्यामंदिर या शाळेला गुरूवारी (दि.१२) सील ठोकले. या शाळेवर एक लाख ४४ हजार १३७ हजार रूपयांची सन १९९३-९४ पासूनची थकबाकी आहे.
पालिकेची कर वसुली मोहीम सातत्याने सुरूच असून त्यांतर्गत कर वसुली पथकाने बाजपेई वॉर्डातील संत कवरराम शिक्षण परिषद संचालीत सरस्वती विद्यामंदिरात धडक दिली. या शाळेवर सन १९९३-९४ पासून एक लाख ४४ हजार १३७ रूपयांची थकबाकी आहे. या थकबाकीला घेऊन कर विभागाने शाळेला मागणी बील दिले. त्यावरही कर न भरल्याने कर विभागाने शाळेला कर वसुली नोटीस दिली. मात्र त्याचाही काहीच फायदा निघाल्याने अखेर मालमत्ता जप्ती अधिपत्र शाळेला बजावण्यात आले होते. यावर शाळेकडून कर वसुली विभागाला १५ फेब्रुवारी पर्यंत थकबाकी भरण्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले होते. मात्र दिलेली मुदत संपल्यावरही शाळेकडून काहीच उत्तर किंवा प्रतिसाद मिळत नव्हता.
अखेर मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या मार्गदर्शनात कर निरीक्षक श्याम शेंडे, लिपीक दिनेश शुक्ला, संतोष नेवारे, मितेंद्र बसेना, उमेंद्र दीप, श्यामस्वरूप यादव, पप्पू नकाशे यांनी गुरूवारी (दि.१२) शाळेत धडत दिली. मुख्याधिकारी मोरे यांनी मुख्याध्यापक एस.पी.जैन यांच्यासोबत बोलणी करून थकबाकीची मागणी केली. एवढेच नव्हे तर रोख स्वरूपात जमत नसल्यास पोस्ट डेटेड चेक देण्यास सांगीतले. मात्र मुख्याध्यापकांनी कर भरण्यास असमर्थता दशर्विली व काहीच सहकार्य केले नाही. परिणामी पथकाने मुख्याध्यापकांच्या कक्षाला सिल केले. (शहर प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांच्या कक्षालाही सील
सध्या परिक्षांचा काळ सुरू असून सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांचीही परिक्षा आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीने कर वसुली पथकाने संपूर्ण शाळेला सील केले नाही. तर फक्त मुख्याध्यापकांच्या कक्षालाच सील ठोकले. विशेष म्हणजे आजच्या कारवाई दरम्यान मुख्याध्यापक जैन यांनी राजकीय व्यक्तींची मदत घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला.
आता जप्तीची कारवाई
कर वसुली विभागाकडून जे थकबाकीदार काहीच सहकार्य करीत नाही अशांना नियमानुसार मालमत्ता जप्ती अधिपत्र देतात. शहरात अशा कित्येक थकबाकीदारांना मालमत्ता जप्ती अधिपत्र देण्यात आले आहे. आता पथक त्यांच्याकडे कर वसुलीसाठी जाणार असून त्यांच्याकडून वसुली न झाल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे कर निरीक्षक शेंडे यांनी सांगीतले.