महिलांच्या स्वावलंबनाला संजीवनीचा आधार

By Admin | Updated: September 8, 2016 00:31 IST2016-09-08T00:31:33+5:302016-09-08T00:31:33+5:30

ग्रामीण भागातील कष्टकरी महिला पदरमोड करून पैशाची बचत करीत आहेत.

Sanjivani's base for women's self-reliance | महिलांच्या स्वावलंबनाला संजीवनीचा आधार

महिलांच्या स्वावलंबनाला संजीवनीचा आधार

आर्थिक विकास : शेतीच्या सिंचनासह थाटले अनेक व्यवसाय
गोंदिया : ग्रामीण भागातील कष्टकरी महिला पदरमोड करून पैशाची बचत करीत आहेत. हाच पैसा त्यांना बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यास आधार ठरला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटीत करून आर्थिक साक्षरता, नेतृत्व विकास, उद्योजकता विकासाबाबत प्रशिक्षण देवून आणि योग्य मार्गदर्शनातून स्वावलंबनाचा मार्ग दाखिवला आहे. गोवारीटोल्यातील आदिवासीबहुल महिला सभासदांसाठी संजीवनी आदिवासी स्वयं सहाय्यता महिला बचतगट त्यांच्यासाठी मार्गदाता ठरला आहे.
गोरेगाव तालुका मुख्यालयापासून २३ कि.मी. अंतरावर असलेले गोवारीटोला हे गांव. गावातील १० आदिवासी व अन्य समाजातील महिलांनी एकत्र येवून संजीवनी महिला बचतगटाची स्थापना २० आॅक्टोबर २००८ रोजी आदिवासी उपयोजनेंतर्गत केली. चोपा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत संजीवनी बचतगटाने आपले बचत खाते उघडले. सुरु वातीला ५० रूपये याप्रमाणे बचतगटातील प्रत्येक महिला बँकेत महिन्याकाठी बचत करु लागली. माविमच्या मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे त्यांच्यात आत्मविश्वास बळावला.
जानेवारी २०१३ पासून प्रत्येक महिला महिन्याला १०० रूपये बचतगटाच्या बँक खात्यात पैसे जमा करु लागली. महिलांची दर महिन्याला नियमित बचत आणि अंतर्गत आर्थिक देवाण-घेवाण बघून दिलेले प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे आपणही उद्योग-व्यवसाय सुरु करु न स्वावलंबी होवू शकतो, असा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झाला. गटातील अंतर्गत कर्जाचा उपयोग महिलांनी शेती, आरोग्य, घरकाम आणि मुलामुलींच्या शिक्षणासाठी केला. माविमच्या माध्यमातून संजीवनीच्या महिलांना आर्थिक साक्षरता, नेतृत्व विकास, लेखा संच आणि उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण मिळाले.
बचतगटातील महिलांनी आपल्या कष्टातून जमा केलेले ३६ हजार रूपये ३ वर्षाकरिता जानेवारी २०१५ मध्ये फिक्स डिपॉझीट केले. आता त्यांना जानेवारी २०१८ मध्ये ४८ हजार रूपये मिळणार आहेत. बचतगटातील महिलांची अंतर्गत कर्जामध्ये गरज पूर्ण होत नसल्यामुळे माविमच्या सहयोगिनी रत्नमाला सरजारे यांच्या मार्गदर्शनाने आयसीआयसीआय बँकेकडून १६ एप्रिल २०१३ ला एक लाख ९६ हजार ९०० रु पयांचे कर्ज मिळवून दिले. तसेच १६ नोव्हेंबर २०१५ मध्ये याच बँकेकडून पुन्हा ३ लाख ३४ हजार ८०० रु पये बचतगटाला कर्ज मिळवून देण्यात सहयोगिनी सरजारे यांनी मोलाची मदत केली.
बचतगटातील उत्तरा औरासे यांनी ५० हजार रु पये, रु पाली औरासे यांनी ५० हजार रु पये आणि छाया येळे यांनी ७५ हजार रु पये कर्ज घेवून शेतीला सिंचनाची बारमाही व्यवस्था व्हावी म्हणून स्वत:च्या शेतात बोअरवेल करून घेतली. केवळ खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर शेती करणाऱ्या महिलांना रबी व उन्हाळी पिकांसाठी बोअरवेल उपयुक्त ठरली. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या थोड्या शेतीतून उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली.
शेवंता बिसेन यांनी ७५ हजार रु पयांतून मालवाहक गाडी खरेदी केली. तसेच बचतगटातून अंतर्गत कर्ज म्हणून ४५ हजार रूपये घेवून मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरु केला. बचतगटामुळे मालवाहक गाडीला भाडे मिळू लागले आणि डेकोरेशनचा व्यवसायही चांगला चालू लागला.
संजीवनी महिला स्वयंसहायता बचतगटामुळे महिलांच्या उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत वाढण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबास आर्थिक हातभार लागण्यासही मदत झाली. (प्रतिनिधी )

‘संजीवनी’चे अनेक सामाजिक उपक्रम
गोवारीटोल्यात संजीवनी बचतगटाच्या महिला थोर पुरु षांच्या जयंती, पुण्यतिथींचे तसेच विविध स्पर्धांचे देखील आयोजन करीत आहे. कुपोषण निर्मूलन, वृक्षारोपण, बेटी बचाव-बेटी बढाओ यासारख्या उपक्रमात संजीवनीच्या सभासद महिला उत्साहाने भाग घेत आहेत. ग्रामसभा, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या महिला अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचतगटामुळेच त्यांना स्वावलंबाची संजीवनी मिळाली असून कुटुंबाच्या अर्थाजनात बचतगटातील सदस्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. पूर्वी केवळ चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित असलेल्या महिला बचतगटामुळे स्वावलंबी होत असताना दिसून येत आहे.

Web Title: Sanjivani's base for women's self-reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.