जिल्ह्यातील ८६ हजार घरकुलांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:25+5:302021-02-05T07:47:25+5:30
गोंदिया : घरकुलासाठी रेती, विटा तथा इतर साहित्यासाठी येणारी शासकीय अडचण दूर व्हावी, तथा घरकुलांचे गावकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास जावे, ...

जिल्ह्यातील ८६ हजार घरकुलांना मंजुरी
गोंदिया : घरकुलासाठी रेती, विटा तथा इतर साहित्यासाठी येणारी शासकीय अडचण दूर व्हावी, तथा घरकुलांचे गावकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास जावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी थेट खमारी व अदासी या दोन ग्रामपंचायतीत जाऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या ऐकून त्या वेळीच मार्गी लावल्याने गावकऱ्यांत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
संपूर्ण जिल्ह्यात साधारणत: ८६ हजार घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. यातील जवळपास ४५ हजार घरकुले पूर्णत्वास येत आहेत. घरकुलांचे वेगवेगळ्या टप्प्यात बांधकाम पोहोचले. मात्र, विविध तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर घरकुलांच्या बांधकामातील लाभार्थ्यांच्या समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांच्या लक्षात आल्या. त्यामुळे त्यांनी थेट लाभार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. बुधवारी गोंदिया तालुक्यातील खमारी येथे लाभार्थ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा डी. बी. हरिणखेडे उपस्थित होते. खमारी येथे ४५० लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत गावकऱ्यांनी रेती उपलब्ध होत नसल्याची समस्या सांगितली. शिवाय विटा, पाणीप्रश्न, साहित्याची ने-आण करण्यासाठी येणारा खर्च या सर्व समस्यांचा पाढाच गावकऱ्यांनी वाचला.
.....
रेती विनामूल्य मिळणार
गावातीलच ट्रॅक्टरधारकांशी संवाद साधून रेती विनामूल्य मिळणार असून, वाहतुकीसाठी कमी दर आकारण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांनी केले. रेतीसाठी शासनाला कोणत्याही प्रकारचा निधी देण्याची गरज भासणार नाही. मात्र, वाहतुकीचा खर्च गावकऱ्यांनी सहन करावा, अशा यावेळी सूचना केल्या.
...
नाथजाेगी समाजाशी साधला संवाद
मुकाअ थेट पालावर
अदासी येथे नाथजोगी समाजाची संख्या मोठी आहे. या समाज बांधवांच्या समस्या सोडविण्यासह त्यांच्या कच्च्या घरांच्या जागेवर पक्के घरकूल व्हावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी थेट पालावरच भेट दिली. नाथजोगी लोकांच्या समस्या ऐकल्या. त्या वेळीच सोडविण्याची ग्वाही देऊन नाथजोगी लोकांना पशुधन उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूतोवाच केले. नाथजोगींच्या समस्या ऐकण्यासाठी मुकाअ थेट पालावरच पोहोचल्याने नाथजोगी समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते.