‘सायलेन्स झोन’मध्ये उभारणार समाजभवन

By Admin | Updated: January 1, 2015 23:02 IST2015-01-01T23:02:59+5:302015-01-01T23:02:59+5:30

शहराच्या मध्यवस्तीमधील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या समोरील भागात समाजभवनाचे (कॉम्युनिटी हॉल) बांधकाम करण्यास परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र हा परिसर

Samaj Bhavna will be set up in 'Silence Zone' | ‘सायलेन्स झोन’मध्ये उभारणार समाजभवन

‘सायलेन्स झोन’मध्ये उभारणार समाजभवन

गोंदिया : शहराच्या मध्यवस्तीमधील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या समोरील भागात समाजभवनाचे (कॉम्युनिटी हॉल) बांधकाम करण्यास परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र हा परिसर ‘सायलेन्ट झोन’ असताना या ठिकाणी समाजभवनाला परवानगी देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ठिकाणी समाजभवनाची उभारणी होण्याच्या पार्श्वभूमीवर गंगाबाई रुग्णालय प्रशासनासह समस्त डॉक्टरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
शहरातील सिव्हील लाईन परिसरात ७५ वर्षे जुने बाई गंगाबाई सरकारी महिला रुग्णालय कार्यरत आहे. २०० खाटांच्या या रुग्णालयात जिल्हाभरातून महिला व बालकांना उपचारासाठी दाखल केले जात असल्याने हे रुग्णालय सदैव रुग्णांनी खचाखच भरून असते. या रुग्णालय परिसरातच आता शासकीय नर्सिंग कॉलेजचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या एक बाजुला बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्गही सुरू होणार आहेत, तर दुसऱ्या बाजुला असलेल्या रिकाम्या जागेवर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे क्वॉर्टर्स बनविले जाणार आहेत. या क्वॉर्टर्सच्या समोरसमोरील रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने असलेल्या पडिक क्वॉर्टर्सच्या जागेवर समाजभवन बनविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
समाजभवनासाठी दिली जात असलेली प्रस्तावित जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. या जागेवर समाजभवनाची उभारणी करण्यासाठी ती जागा न.प.कडे हस्तांतरित करण्यात यावी, असा ठराव गोंदिया नगर परिषदेने तीन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत घेतला. त्यानुसार एक प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. या समाजभवनासाठी नझुल सिट नं.८, ९ प्लॉट नं. ४, ४/१ आणि ४/२ वरील २१३६ चौरस मीटर जागेची मागणी नगर परिषदेने केली आहे.
वास्तविक ही जागा रुग्णालयापासून आणि डॉक्टरांच्या प्रस्तावित क्वॉर्टर्सच्या जागेपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे हा परिसर ‘सायलेन्ट झोन’ मध्ये मोडतो. या ठिकाणी समाजभवन तयार झाल्यानंतर त्या भवनात विविध सार्वजनिक कार्यक्रम होतील. विवाह समारंभासारख्या कार्यक्रमामुळे बँड, डिजे सुद्धा तिथे वाजतील. त्यामुळे बाळंतपणासाठी या रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या नवजात बाळांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. यातून त्या बाळांना बहिरेपणा किंवा महिलांना रक्तदाबासारखा त्रासही होऊ शकतो, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. असे असताना ही जागा सायलेन्स झोन आहे किंवा नाही, हेसुद्धा न.प.ला माहित नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नियम काय म्हणतो?
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने २१ एप्रिल २००९ आणि ७ आॅगस्ट २००९ ला जारी केलेल्या शासन आदेशात ध्वनीप्रदुषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. त्या रुग्णालयापासून १०० मीटर अंतरापर्यंतचा परिसर सायलेन्स झोन मानल्या जाईल असेही म्हटले आहे. मात्र प्रस्तावित समाजभवन हे रुग्णालयापासून ५० मीटरपेक्षाही कमी अंतरावर आहे. त्यामुळे या समाजभवनास परवानगी मिळाली तर ते सायलेन्ट झोनच्या नियमाचे उल्लंघनच होईल, असे मानले जात आहे.
परवानगी देऊ नये- दोडके
गंगाबाई रुग्णालयाच्या परिसरात बनत असलेले समाजभवन अगदी योग्य नाही. अशा सार्वजनिक भवनात होणाऱ्या कार्यक्रमांचा रुग्णांना किती त्रास होईल, याचाही विचार करायला पाहीजे. रुग्णांना आवाजाचा त्रास होतो. साधे रुग्णाजवळ मोठ्या आवाजात बोलणेही योग्य नसते. तिथे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या डीजे, लाऊडस्पिकर, बँड वगैरेचा रुग्णांना किती त्रास होईल? ही चिड आणणारी गोष्ट आहे. खरे म्हणजे मलाही या परिसरात अशा पद्धतीचा हॉल बनत असल्याची कल्पना नव्हती. पण अलिकडेच याबद्दल कळले. प्रशासनाने अशा हॉलला या परिसरात परवानगी देऊ नये, असे मत गंगाबाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके यांनी सांगितले.

Web Title: Samaj Bhavna will be set up in 'Silence Zone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.