कोरोनोमुळे रेल्वे आरक्षण रद्द करण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:34+5:30
पंधरा दिवस पर्यटन,धार्मिक स्थळी नागरिकांना न जाण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून दक्षता घेत आहे. त्यामुळे अनेकांनी २० मार्च ते ३० एप्रिल दरम्यान बाहेरगावी जाण्याचे वेळापत्रक रद्द केले असून यासाठी केलेले रेल्वे आरक्षण रद्द करित आहे. त्यामुळेच गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील दोन दिवसांपासून दररोज दीडशे रेल्वे तिकिटांचे आरक्षण रद्द केले जात आहे.

कोरोनोमुळे रेल्वे आरक्षण रद्द करण्यासाठी गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : चीनसह देशभरात सर्वत्र झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तर प्रशासनाने सुध्दा पुढील पंधरा दिवस पर्यटन,धार्मिक स्थळी नागरिकांना न जाण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून दक्षता घेत आहे. त्यामुळे अनेकांनी २० मार्च ते ३० एप्रिल दरम्यान बाहेरगावी जाण्याचे वेळापत्रक रद्द केले असून यासाठी केलेले रेल्वे आरक्षण रद्द करित आहे. त्यामुळेच गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील दोन दिवसांपासून दररोज दीडशे रेल्वे तिकिटांचे आरक्षण रद्द केले जात आहे.
कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका पर्यटन आणि टूर अॅन्ड ट्रव्हॅल्स कंपन्याना बसत आहे.कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा सल्ला प्रशासनाकडून दिला जात आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालय तसेच चित्रपटगृह व मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
महाराष्ट्रत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्यामुळेच अनेकांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहे.तर काहींनी मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिल महिन्यात बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले होते. यासाठी त्यांनी रेल्वेचे आरक्षण सुध्दा केले होते. मात्र कोरोनामुळे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागत आहे. त्यामुळे बस, ट्रॅव्हल्स आणि रेल्वे गाड्यांमधील गर्दी कमी होत असल्याचे चित्र आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज पाचशेवर रेल्वे तिकीटांचे आरक्षण केले जात होते. तसेच केलेले आरक्षण रद्द करण्याचे प्रमाण २० ते २५ तिकीट ऐवढे होते. मात्र कोरोनामुळे मागील दोन दिवसांपासून येथील रेल्वे स्थानकाच्या चारही आरक्षण खिडक्यांवरुन दररोज दीडशेहून अधिक आरक्षण तिकीट रद्द केले जात आहे. तर तिकीट आरक्षणाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. कोरोनामुळेच रेल्वेचे केलेले आरक्षण रद्द केले जात असल्याचे रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रातील अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गोंदिया आगाराचे दीड लाखाने उत्पन्न घटले
रेल्वे पाठोपाठ कोरोनाचा परिणाम महामंडळाच्या बसेसवरही झाला आहे.गोंदिया आगाराच्या काही बस फेºया प्रवाशांअभावी रद्द झाल्या आहे. तर मागील तीन चार दिवसांपासून प्रवाशांची संख्या घटल्याने गोंदिया आगाराला दररोज दीड लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे गोंदिया आगार व्यवस्थापक संजना पटले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.