नियम ४० किलो ४०० ग्रॅमचा पण वजन ४२ किलोचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:23+5:30
शासकीय धान खरेदीला ४ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. आत्तापर्यंत या दोन्ही विभागाच्या एकूण १०० केंद्रावरुन ९ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या धानाची किमत ही १५० कोटी रुपयांच्या आसपास आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हे सहकारी संस्थाशी करार करुन त्यांच्या माध्यमातून धान खरेदी करतात.

नियम ४० किलो ४०० ग्रॅमचा पण वजन ४२ किलोचे
अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धान खरेदीसाठी शासनाने नियम तयार केले आहेत. यानुसार धान खरेदी करताना प्रती कट्टा ४० किलो ४०० ग्रॅम वजन घेणे अनिवार्य आहे. मात्र काही केंद्रावर वजनाच्या नावावर शेतकऱ्यांकडून कट्टयामध्ये ४२ किलो धान घेऊन शेतकऱ्यांची त्यांच्या डोळ्या देखत लूट केली आहे. यातून एका केंद्राला दररोज १८ हजार रुपयांचा नफा मिळत असून तो केंद्रावरील कर्मचारी आपसात वाटून घेत असल्याची माहिती आहे.धान खरेदी केंद्रावरील मापातील पापाकडे मात्र या दोन्ही विभागाचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे सुध्दा दुर्लक्ष झाले असल्याने बळीराजाची लूट सुरूच आहे.
शासकीय धान खरेदीला ४ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. आत्तापर्यंत या दोन्ही विभागाच्या एकूण १०० केंद्रावरुन ९ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या धानाची किमत ही १५० कोटी रुपयांच्या आसपास आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हे सहकारी संस्थाशी करार करुन त्यांच्या माध्यमातून धान खरेदी करतात. धान खरेदी करण्यासाठी शासनाने नियमवाली ठरवून दिली आहे. तसेच या नियमांचे फलक प्रत्येक केंद्रावर लावण्याचे निर्देश दिले आहे. पण या निर्देशाचे एकाही केंद्रावर पालन केले जात नाही. शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान खरेदी करताना ते ईलेक्ट्रानिक वजन काट्यावर खरेदी करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच एका कट्यात ४० किलो ४०० ग्रॅम धान घ्यावे त्यापेक्षा अधिक धान घेऊन कट्टयामध्ये घेऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहे. पण या निर्देशांना पूर्णपणे धाब्यावर बसवून धान खरेदी करीत आहे. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करताना प्रती कट्टयामागे ४२ किलो धान घेतले जात असून यामुळे शेतकºयांचे प्रती कट्टयामागे १ किलो ६०० ग्रॅम धान अधिक जात आहे. यामुळे प्रती कट्टयामागे ३० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. एका धान खरेदी केंद्रावर दिवसभरात ३०० ते ४०० कट्टे धान खरेदी केले जात असून शेतकऱ्यांकडून अतिरिक्त घेतलेल्या धानातून १८ ते २० हजार रुपये केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या घश्यात जात आहे. केंद्रावर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लुटीकडे मात्र या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यावर कुठलीच कारवाही केली जात नसल्याने केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हिम्मत सुध्दा दिवसेंदिवस वाढ आहे.
शेतकऱ्यांकडून अतिरिक्त घेतलेल्या धानाची किंमत लाखात
जिल्ह्यात या दोन्ही विभागाची शंभरावर धान खरेदी केंद्र आहेत. या केंद्रावर दररोज हजारो क्विंटल धान खरेदी केली जाते. एका कट्टयामागे १ किलो ६०० ग्रॅम धान अतिरिक्त घेतले जात असून यातून गोळा होणारी रक्कम ही लाखांच्या घरात आहे. या रक्कमेचे अनेक वाटेकरी असल्याने कारवाही करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती आहे.
कुऱ्हाडी केंद्रावर उघडकीस आला प्रकार
शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर कशी लूट केली जात आहे. हे उघडकीस आणण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील केंद्रावर धाड टाकून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच याची चित्रफित तयार करुन हे पुरावे जिल्हाधिकारी आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर मापात माप केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.
तक्रारींचा खच पण दखल घेणार कोण
शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याच्या अनेक तक्रारी दोन्ही विभाग, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारींची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती संवेदनशिल आहे हे दिसून येते.