५८ टक्के रोवण्या पूर्ण

By Admin | Updated: August 5, 2014 23:29 IST2014-08-05T23:29:27+5:302014-08-05T23:29:27+5:30

जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात पावसाने बऱ्याच कालावधीपर्यंत दांडी मारल्यामुळे यावर्षी रोवण्या लांबल्या आहेत. आतापर्यंत ५८ टक्के रोवण्या झाल्या असून अजून ४२ टक्के रोवण्या शिल्लक आहे.

Roof full of 58 percent | ५८ टक्के रोवण्या पूर्ण

५८ टक्के रोवण्या पूर्ण

समाधानकारक पाऊस : शेतीच्या कामासाठी मजुरांची वाणवा
गोंदिया : जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात पावसाने बऱ्याच कालावधीपर्यंत दांडी मारल्यामुळे यावर्षी रोवण्या लांबल्या आहेत. आतापर्यंत ५८ टक्के रोवण्या झाल्या असून अजून ४२ टक्के रोवण्या शिल्लक आहे. पोळ्याच्या सणापर्यंत सर्व रोवण्या आटोपतील असा विश्वास कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात खरीप हंगामात धाानाच्या रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर आहे. त्यापैकी ५ आॅगस्टपर्यंत १ लाख ७ हजार ८४२ हेक्टरवर धानाची रोवणी आणि आवत्या झाल्या आहेत. त्यापैकी ९४ हजार ६०० हेक्टरवर रोवणी असून १३ हजार २४२ हेक्टरवर आवत्या पद्धतीने भात लागवड झाली आहे.
पावसाळ्याच्या सुरूवातीला मृगात आलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने धानाचे पऱ्हे लावले. परंतू त्यानंतर पावसाने जवळपास तीन आठवडे दांडी मारल्यामुळे पऱ्हे करपून जाण्याची वेळ आली. शेतकऱ्यांनी कसेबसे वरचे पाणी देऊन हे पऱ्हे जगविले. तर काही शेतकऱ्यांना पुन्हा पऱ्हे लागवड करावी लागली.
१५ दिवसांपूर्वी चार दिवस झालेल्या संततधार पावसाने पावसाचा अनुशेष भरून काढला असला तरी बांध्यात पुरेशा प्रमाणात पाणी साचलेच नव्हते. मात्र गेल्या चार-पाच दिवसात सर्वदूर झालेल्या पावसाने बांध्यामध्ये चांगले पाणी साचले असून रोवण्यांनी पुन्हा वेग घेतला आहे.
एकाचवेळी सर्व शेतकरी रोवणीच्या कामात लागले असल्यामुळे ग्रामीण भागात सध्या मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फजिती होत आहे. लवकर रोवणी आटोपण्यासाठी शेतकरी वर्ग मजुरांसाठी भटकताना दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Roof full of 58 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.