पावसामुळे रस्ते झाले खराब
By Admin | Updated: July 19, 2014 23:58 IST2014-07-19T23:58:13+5:302014-07-19T23:58:13+5:30
आतापर्यंत पाऊस नसल्यामुळे बचावलेल्या रस्त्यांचे पितळ आता उघडे पडत आहे. ५० हजार लोकसंख्येच्या गोरेगाव तालुक्यातील रस्त्यांना भकास अवस्था प्राप्त झाली आहे. परंतू कोणत्याही

पावसामुळे रस्ते झाले खराब
गोरेगाव : आतापर्यंत पाऊस नसल्यामुळे बचावलेल्या रस्त्यांचे पितळ आता उघडे पडत आहे. ५० हजार लोकसंख्येच्या गोरेगाव तालुक्यातील रस्त्यांना भकास अवस्था प्राप्त झाली आहे. परंतू कोणत्याही लोकप्रतिनिधीला याबाबत काही सोयरसूतक नसल्याचे दिसते.
तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांची स्थिती खराब झाली आहे. अपुऱ्या नियोजन व इच्छाशक्तीच्या अभावामुळे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हे सांगणे कठीण आहे. तालुक्यातील मसगाव येथील अंतर्गत रस्ता आरशात पाहिल्यासारखा आहे. एवढी खराब स्थिती त्या रस्त्याची आहे. कटंगी येथील अंतर्गत रस्ता कंटगी-सिलेगाव रस्ता अखेरच्या घटका मोजत आहे. कुऱ्हाडी ते हिरापूर डांबरीकरण रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
पाथरी-पिंडकेपार रस्त्यातील पुलाजवळ चारचाकी वाहन जाण्याची स्थिती नाही. पुलाच्या पुढे रस्त्याच्या मधोमध मोठे भगदाड पडले आहे. खाडीपार-आसलपाणी रस्त्यावर गिट्टी निघाली आहे. येथे गाडीचे टायर कधी फाटतील याची शाश्वती नाही. पुरगाव येथील अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. पहिल्याच पावसामुळे रस्त्याची दयनिय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हिरडामाली-पूरगाव रेल्वे फाटकाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे चारचाकी वाहन येथून नेता येत नाही. अनेकांना रस्ता पाहून आल्यापावली परतावे लागते. गौरीटोला-परसाळीटोला रस्त्यावर दोन-दोन फुटाचे खड्डे पडलेले आहे. येथील तिल्ली ते गौरीटोला रस्त्याचे दोन वर्षापूर्वी डांबरीकरण झाले पण कंत्राटदाराने डांबरीकरणाच्या रस्त्यावर डांबरचा वापर केला की नाही. अशी शंका येते. या रस्त्याचीही स्थिती दयनिय आहे. (तालुका प्रतिनिधी)