On the road leading to the semi-detached | अर्धनग्नावस्थेत उतरले रस्त्यावर
अर्धनग्नावस्थेत उतरले रस्त्यावर

ठळक मुद्देशिक्षकांच्या आंदोलनाचा ११ वा दिवस : आश्वासनांची पूर्तता होणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भिक मागून तर कधी झाडावर आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी धडपडत असलेल्या शिक्षकांनी सोमवारी (दि.१९) अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा ११ वा दिवस असूनही अद्याप त्यांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही.
मागण्यांना घेऊन माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाच वर्षापासून खोटी आश्वासने, खोटी माहिती व भूलथापा देण्याचेच कार्य केल्याचा आरोप या शिक्षकांचा आहे. शासनाने मार्च २०१८ च्या मुंबई येथील अधिवेशनात १४६ उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी घोषीत केले. मार्च २०१९ च्या अधिवेशनात १६५६ उच्च माध्यमिक शाळांना अघोषीत ठेवून या सर्वांची म्हणजे १४६+१६५६ शाळांच्या अनुदानाची गेल्या अधिवेशनात आर्थिक तरतूद सुद्धा केली. त्यासंबंधी सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झालेले असून आता फक्त १६५६ उच्च माध्यमिक शाळांची घोषणा व त्यासंबंधी शासन निर्णय काढणे बाकी आहे.
या कामासाठी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांनी विना विलंब शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय जाहीर करावा व शिक्षकांच्या खात्यावर त्वरीत पगार जमा करुन वेतन देण्याची मागणी केली आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमिक कृती समितीच्यावतीने शासनस्तरावर २२१ आंदोलने करण्यात आली. आता शेवटचे २२२ वे बेमुदत शाळाबंद धरणे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरु आहे.
या आंदोलनांतर्गत शिक्षकांनी भिक मांगो आंदोलन केले तर झाढांवर चढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. परिणामी सोमवारी (दि.१९) शिक्षकांनी अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून सर्वांचे लक्ष वेधले.
याप्रसंगी जिल्हा कृती समितीचे प्रा.के.बी.बोरकर, प्रा.पी.पी.मेहर, व्ही.आर.पोगळे, जे.बी.पटले, ए.एन.कठाणे, आर. एस. जगणे, एस.डी. येळे, एम.टी. चौरे, एम.ए.उके, एम.एल.पटले, प्रतीक मेंढे यांच्यासह अन्य उपस्थित होते.


Web Title: On the road leading to the semi-detached
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.