गावांना जोडणारे रस्ते ढेपाळलेले
By Admin | Updated: February 9, 2015 23:16 IST2015-02-09T23:16:16+5:302015-02-09T23:16:16+5:30
पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे हाल झालेले असतानाही त्यांना अद्याप

गावांना जोडणारे रस्ते ढेपाळलेले
गोंदिया : पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे हाल झालेले असतानाही त्यांना अद्याप दुरूस्त किंवा नविणीकरण करण्यात आले नाही. अनेक ठिकाणचे रस्ते पूर्णत: उखडले असून गिट्टी सभोवार पसरली आहे. तर अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यांच्या दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासादरम्यान नेहमीच अपघाताची शक्यता असते. अशात या दयनिय रस्त्यांचा निवडणुकांवर काय परिणाम होतो, हे काळच सांगेल.
आमगाव : काही दिवसांनी तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. प्रत्येक क्षेत्राचे आरक्षण जाहीर झाले. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. मात्र जिल्हा परिषदेची सतत पाच वर्षे सत्ता असूनही तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते ढेपाळलेल्या अवस्थेत आहेत. याची झळ प्रवाशी व वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
यापूर्वी राज्यात सत्ता वेगळ्या पक्षाची व जिल्ह्यात दुसऱ्या पक्षाची, असे चित्र होते. आता चित्र पूर्ण बदलले आहे. मात्र निधी नाहीच्या नावावर अधिकारी सर्वसामान्यांना बळी देवून वेळकाढूपणाचे धोरण अंगिकारत आहेत. तब्बल पाच वर्षांपासून तालुक्यातील ढेपाळलेल्या रस्त्यांची कोणतीच सुधारणा झाली नाही. मग पाच वर्षांत निधी न येण्यामागे कारण काय? किंवा विलंब का? असे प्रश्न सर्वसामान्य नागकिरांना पडत आहेत.
तिरोडा : तिरोडा ते साकोली मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सर्रा ते उमरझरी दरम्यान रस्ता पूर्णत: उखडलेला असून मोठेमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता दुरूस्तीची मागणी वारंवार होत असतानाही दुरूस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांना मोठाच त्रास सहन करावा लागतो.
सर्रा ते उमरझरी हा रस्ता नागझिरा अभयारण्य तसेच रिझर्व्ह फॉरेस्ट झोनमध्ये येते. रस्ता दुरूस्तीसाठी डांबर पिघलवणे, पातळ करण्यासाठी आग जाळावी लागते. परंतु हा रस्ता रिझर्व्ह वनक्षेत्रात येत असल्याने जंगल परिसरात आग पेटवू दिली जात नाही. वन अधिकारी आग पेटवू देत नाही व बाहेरून मसाला बनवून आणणे परवडत नाही. त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम रखडलेले आहे, अशी चर्चा आहे.
सदर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा लहान-मोठे अपघात झाले आहेत. या प्रकारांकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून रस्ता दुरूस्ती करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शोभेलाल दहीकर, व्ही.व्ही. मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते भोयर आदींनी केली आहे.
सालेकसा : आमगावखुर्द (सालेकसा) अंतर्गत सुभाष चौक ते तहसील कार्यालय मार्ग सतत उपेक्षित राहिला असून या रस्त्याची दुर्दशा कायम आहे.
सदर रस्ता पंचायत समिती कार्यालयाच्या मागून गेला असून सालेकसा येथील रहिवासी याच मार्गाने गावाच्या बाहेर निघतात. तसेच याच मार्गाने सर्व विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जातात. मात्र या मार्गावर खड्डे व घाणीचे साम्राज्य इत्यादींमुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास झाल्याशिवाय राहत नाही. सालेकसा परिसरात इतर मार्ग, चौकांची दुरुस्ती व नवीन सिमेंट मार्ग तयार करण्यात आले आहेत. मात्र सुभाष चौकात आतापर्यंत सपेशल दुर्लक्ष करण्यात आले. हे परिसर आमगाव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत मोडत असून या ग्रामपंचायतीला मोठे उत्पन्न मिळते. त्याचप्रमाणे या क्षेत्राचा समावेश आमगाव खुर्द जि.प. क्षेत्र आणि पंचायत समिती क्षेत्रात होतो. त्या माध्यमातूनसुद्धा या चौकाची किंवा मार्गाची दुर्दशा दूर केली जाऊ शकते. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्यात आले नाही. सुभाष चौकाला सिमेंट क्रांक्रीटद्वारे मजबूत व सुंदर बनविण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (तालुका/शहर प्रतिनिधी)