पावसाची वाढतेय तूट अन शेतकरी चिंतातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:55+5:30
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो.यंदा हवामान विभागाने सुध्दा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यावर्षी सुरूवातीपासून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही.

पावसाची वाढतेय तूट अन शेतकरी चिंतातूर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा जिल्ह्यात सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने पावसाची तूट वाढत आहे. १ जून ते २० जुलैपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसावर नजर टाकली असता २२७.१५ मीमी पावसाची तूट निर्माण झाली आहे. जून, जुलै हे दोन महिने पावसाचे समजले जातात. मात्र याच महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो.यंदा हवामान विभागाने सुध्दा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यावर्षी सुरूवातीपासून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणीची कामे सुध्दा पूर्णपणे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ २५ टक्के रोवणी झाली असून ७५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. जिल्ह्यात पाऊस अधून मधून हजेरी लावत असला तरी दमदार पाऊस होत नसल्याने शेतीच्या कामावर सुध्दा परिणाम झाला आहे.
एकंदरीत पावसाची तूट वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते त्यातच आताच पावसाची तूट सरासरी २२७.१५ मीमीवर पोहचली आहे. त्यामुळे आठ दहा दिवसात पाणी पाऊस न झाल्यास पावसाची तूट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान यंदा पावसाने ओढ दिल्याने धानाच्या उत्पादनावर सुध्दा याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंत केवळ ४४ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली असून १ लाख ४९ हजार हेक्टरवरील रोवण्या शिल्लक आहेत.