शेतातील विहिरीमध्ये पडून हरिणाचा मृत्यू
By Admin | Updated: November 6, 2016 00:57 IST2016-11-06T00:57:59+5:302016-11-06T00:57:59+5:30
अर्जुनी मोरगाव रोडवरील स्थानिक हेमराज श्रीराम पुस्तोडे यांच्या शेतामधील विहिरीत पडून एका वर्षाच्या हरिणाच्या

शेतातील विहिरीमध्ये पडून हरिणाचा मृत्यू
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव रोडवरील स्थानिक हेमराज श्रीराम पुस्तोडे यांच्या शेतामधील विहिरीत पडून एका वर्षाच्या हरिणाच्या पाडशाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारच्या दुपारी घडली.
येथील क्षेत्र कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गावाजवळील झुडपी जंगलातील कम्पार्टमेंट नंबर ४६८००४ ला लागून शेतशिवार आहे. जवळच सामाजिक वनीकरण विभागाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका आहे. चाऱ्यासाठी भटकत असलेली हरिण हेमराज पुस्तोळे यांच्या शेतातील तुरीच्या झाडावर आपली भूक भागविण्यासाठी आली. मार्गक्रमण करीत असलेली हरिण एकाएकी विहिरीत पडली. पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीमध्ये एक वर्षाच्या असलेल्या हरिणाच्या पाडशाचा करुण अंत झाला. शेतातील विहिरीमध्ये पडून हरिणाचा मृत्यू झाल्याची माहिती शेतमालक हेमराज पुस्तोळे यांनी वनविभागाला दिली. क्षेत्र सहायक एम.एम. धुर्वे, बीटरक्षक एम.एस. प्रधान यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. विहिरीमधून हरिणाला काढून क्षेत्र कार्यालयातील खुल्या जागेत मृत हरिणला जमिनीमध्ये पुरण्यात आले. वन्यप्राण्यांना शेतातील आकर्षण वाढत आहे. शेतामधील पिकांवर ताव मारण्याच्या हव्यासापोटी प्राण्यांचे पाय शेतीकडे वळतात. विहीरीमध्ये पडून हरिणाचा मृत्यू झाल्याचा अभिप्राय पशूचिकित्सकांनी दिल्याचे क्षेत्र सहाय्यकांनी सांगितले. (वार्ताहर)