जिल्ह्यातील तांदळाचे गोदाम झाले हाऊसफुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:22+5:30
जिल्हा मार्केटिंग फेडरेश आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत यंदा आत्तापर्यंत एकूण २७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.यापैकी १४ लाख क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. तर १३ लाख क्विंटल धानाची भरडाई करण्याचे आदेश राईस मिलर्सना द्यायचे आहे. मात्र आधीच भरडाई केलेल्या १४ लाख क्विंटल धानाची भरडाई करुन तयार झालेला तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी धानाच्या भरडाईचे आदेश द्यायचे कसे अशी समस्या या दोन्ही विभागांपुढे निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील तांदळाचे गोदाम झाले हाऊसफुल
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. यानंतर खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई केली जाते. भरडाई केलेला तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. मात्र गोदामात पडून असलेल्या ६० हजार मेट्रीक टन तांदळाची उचल अद्यापही करण्यात आली नाही. परिणामी यंदा भरडाई केलेला हजारो क्विंटल तांदूळ ठेवायचा कुठे असा बिकट प्रश्न जिल्हा पुरवठा विभागासमोर निर्माण झाला आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेश आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत यंदा आत्तापर्यंत एकूण २७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.यापैकी १४ लाख क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. तर १३ लाख क्विंटल धानाची भरडाई करण्याचे आदेश राईस मिलर्सना द्यायचे आहे. मात्र आधीच भरडाई केलेल्या १४ लाख क्विंटल धानाची भरडाई करुन तयार झालेला तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी धानाच्या भरडाईचे आदेश द्यायचे कसे अशी समस्या या दोन्ही विभागांपुढे निर्माण झाली आहे. कृषी विभागाने मागील खरीप हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज यंदा पूर्णपणे खरा ठरला. मागील वर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप हंगामात एकूण १८ लाख क्विंटल धान खरेदी केली होती. तर यंदा ५ फेब्रुवारीपर्यंत १९ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी केली आहे.त्यामुळे मागील वर्षीपेक्षा आतापर्यंत दीड लाख क्विंटल खरेदी अधिक झाली आहे. तर खरीप हंगामातील खरेदी मार्चपर्यंत चालते. त्यामुळे पुन्हा आठ ते दहा लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने आत्तापर्यंत ७ लाख ५८ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या एकूण २७ लाख क्विंटल धानापैकी आत्तापर्यंत १४ लाख क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे.
मात्र अद्यापही १३ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गोदाम हाऊस फुल असल्याने भरडाईसाठी धानाची उचल करण्याचे आदेश देण्याची अडचण निर्माण झाली आहे. परिणामी दोन्ही विभागाच्या केंद्राबाहेर खरेदी केलेला धान उघड्यावर तसाच पडून आहे.
गोदामांची क्षमता ६० हजार मेट्रीक टनची
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन त्याची भरडाई केली जाते. भ्राईस मिलर्स धानाची भरडाई करुन नियमानुसार तांदूळ शासनाकडे जमा करतात. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार गोदामातील तांदळाची उचल करुन तो विविध जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. तांदूळ ठेवण्यासाठी गोंदिया येथे ६० हजार मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम आहेत. मात्र अद्यापही गोदामातील तांदळाची उचल करण्याचे आदेश प्राप्त न झाल्याने नवीन तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.
गोदामातील तांदळाची उचल करण्याचे आदेश अद्याप शासनाकडून मिळालेले नाही. येत्या दोन तीन दिवसात आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. आदेश प्राप्त होताच गोदाम रिकामे झाल्यानंतर भरडाई केलेला तांदूळ त्यात ठेवण्यात येईल.
- डी.एस.वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया.