सेंद्रिय शेतीतून ८१ एकरात श्री पद्धतीने भात लागवड
By Admin | Updated: August 11, 2014 23:59 IST2014-08-11T23:59:42+5:302014-08-11T23:59:42+5:30
जिल्ह्यातील मुख्य पिक असलेल्या धानाची लागवड करताना लागवड खर्च वाढला आहे. त्यामुळे कमीत कमी लागवड खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न या तत्वाचे पालन करण्यासाठी अदानी फाऊंडेशनने

सेंद्रिय शेतीतून ८१ एकरात श्री पद्धतीने भात लागवड
गोंदिया : जिल्ह्यातील मुख्य पिक असलेल्या धानाची लागवड करताना लागवड खर्च वाढला आहे. त्यामुळे कमीत कमी लागवड खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न या तत्वाचे पालन करण्यासाठी अदानी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तिरोडा परिसरातील पाच गावातील शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने ‘श्री’ (सिस्टम आॅफ राईस इंटेन्सिफिकेशन) पद्धतीने कशी भात लागवड करावी याचे प्रशिक्षण त्यांना दिले. विशेष म्हणजे हे पिक सेंद्रीय पद्धतीने घेतले जाणार आहे.
अदानी फाऊंडेशनने तिरोडा परिसरातील जी गावे दत्तक घेतली आहेत त्यापैकी ५ गावांमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’च्या रूपात शेतकऱ्यांना या पद्धतीने भात लागवडीसाठी प्रवृत्त केले जात आहे. यात तांत्रिक पद्धतीने जास्त उत्पन्न घेण्याचा आणि कमी खर्चाच्या सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी अदानी फाऊंडेशनने हिवरा येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यात कवलेवाडा, जमुनिया, चिरेखनी, चिखली आणि भिवापूर येथील शेतकरी यात गावांतील १५० शेतकऱ्यांना तीन बॅचमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या शेतकऱ्यांनी नंतर आपापल्या गावांमध्ये जाऊन इतर शेतकऱ्यांना याबाबतची शास्त्रोक्त माहिती दिली. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी श्री पद्धतीने धानाची लागवड करण्याची तयारी दर्शविली त्या प्रत्येकाला ३ किलो धानाचे बियाणे देण्यात आले. यातून या पायलट प्रोजेक्टसाठी ८१ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.
धानाच्या पऱ्हांची वाढ झाल्यानंतर कृषी सहायकांच्या मदतीने एका शेतात धानाच्या रोपांची योग्य पद्धतीने कशी लागवड करायची याचेही प्रात्यक्षिक देण्यात आले. सदर शेतकऱ्यांना सेंद्रीय खत निर्मितीसाठी २०० प्लॅस्टिकचे ड्रमही वाटप करण्यात आल्याचे अदानी फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले .(जिल्हा प्रतिनिधी)