२० कोटी परत जाणार
By Admin | Updated: March 29, 2015 01:41 IST2015-03-29T01:41:24+5:302015-03-29T01:41:24+5:30
गोंदिया जिल्ह्यातील विविध पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे शासनाकडून मिळालेले २० कोटी रुपये पडलेले आहेत.

२० कोटी परत जाणार
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील विविध पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे शासनाकडून मिळालेले २० कोटी रुपये पडलेले आहेत. ही रक्कम शासनाने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला खर्च करण्यासाठी दिली होती. मात्र शिक्षण विभागाने ही राशी विविध पंचायत समित्यांना पाठविली असताना ती पूर्ण खर्च झाली नाही. त्यामुळे शिल्लक रक्कम शासनाला परत जाण्याची दाट शक्यता आहे.
मागील वर्षीपासून ही रक्कम पंचायत समित्यांकडे पडली आहे. शासन वेळोवेळी पत्रव्यवहार करून रक्कम परत मागत आहे. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाहीत.
मागील अनेक वर्षापासून शाळांना सादील खर्चासाठी रक्कम दिली नाही. या मुद्याला घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ही रक्कम जवळ-जवळ २८ कोटी रूपये सांगितली जाते. परंतु सध्या आठ कोटी रूपये शासनाला परत गेले असून उर्वरीत रक्कम कधी परत जाईल या संदर्भात काहीच सांगितले जात नाही.
जेव्हापर्यंत ही रक्कम परत जाणार नाही तेव्हापर्यंत जिल्ह्यातील शाळा सादिलवार राशीपासून वंचित राहणार आहेत. राशी परत न गेल्याचा त्रास शाळांना होत आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)
मंगळवारपासून उपोषण
जिल्ह्याच्या शाळांना सादिलवार राशी उपलब्ध करवून देण्यासाठी, शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याला देण्याची तारीख निश्चित करावी, जानेवारीच्या वेतनापासून वंचित आमगांव तालुक्याच्या शिक्षकांना त्वरीत वेतन देणे, अर्जित रजा, प्रसूति रजा व वैद्यकीय प्रतिपूर्ति बिल ३० मार्च पर्यनत द्या, प्रसूति रजेला आगाऊ मंजूरी देवून नियमित वेतन काढणे, एमटीसी प्रकरणात गोरेगाव तालुक्याच्या १९२ कर्मचाऱ्यांचे थांबविण्यात आलेली वेतन वाढ निश्चित करणे, इतर मागण्यांना घेऊन ३१ मार्च रोजी जि.प. शिक्षण विभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे. मागील २ वर्षापासून शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटत नाही. देवरी तालुक्याच्या ११ शाळा, तिरोडा तालुक्याच्या २ शाळा, आमगाव तालुक्याच्या सर्व शिक्षकांचे वेतन आतापर्यनत झाले नाही. फेब्रुवारी महिन्यात अनुदान उपलब्ध न झाल्यामुळे वेतन झाले नाही. शिक्षकांनी अधिक संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, जिल्हा महासचिव एस.यू. वंजारी, सुधीर वाजपेई, यू.पी. पारधी, नागसेन भालेराव, नूतन बांगरे, आनंद पुंजे, पी.के. पटले यांनी केले आहे.