सहा तालुक्यांत पुन्हा अतिवृष्टी
By Admin | Updated: August 5, 2014 23:30 IST2014-08-05T23:30:37+5:302014-08-05T23:30:37+5:30
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. तिरोडा व अर्जुनी मोरगाव तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांत मंगळवारी सकाळपर्यंतच्या

सहा तालुक्यांत पुन्हा अतिवृष्टी
रजेगाव पूल बंद : हवामान खात्याने दिले जोरदार पावसाचे संकेत
गोंदिया : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. तिरोडा व अर्जुनी मोरगाव तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
या पावसामुळे रस्ते वाहतूक बंद पडत असतानाच घरांच्या पडझडींचीही माहिती येत आहे. त्यातच बाघ नदी फुगल्याने रजेगाव पुलावरून होणारी वाहतूक बंद पडली असून मध्यप्रदेशसोबतचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने ७ आॅगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
सडक अर्जुनी , आमगाव व देवरी तालुक्याला पावसाने सर्वाधीक झोपडल्याचे दिसून येत आहे. परिणामी या तालुक्यांतील रस्ते वाहतुकीवर प्रभाव दिसून येत आहे. संततधार पावसामुळे धरणांचे गेट उघडून त्यातून पाणी सोडले जात आहे. यामुळे नदी- नाले फुगले असून त्यांना पुर आला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सिरपूर धरणाचे ७ गेट ०.९० मीटरने, पुजारीटोला धरणाचे ८ गेट २.१० मीटरने तर कालीसराड धरणाचे २ गेट ०.५० मीटरने उघडण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून बरसत असलेल्या या संततधार पावसामुळे बाघनदीची पातळी वाढली असून यामुळे रजेगाव पुलावरून पुन्हा पाणी वाहू लागले आहे.
या पुलावरून ३० मिमीपर्यंत पाणी वाहात जात असल्याने वाहतूक बंद पडली असून मध्यप्रदेश राज्यासोबतचा संपर्क तुटला आहे. १५ दिवसांपूर्वी असाच संपर्क तुटला होता.
(शहर प्रतिनिधी)