आमगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या किडंगीपार ते खुर्सीपार रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा जवरी ग्रामवासी संघटितपणे आंदोलन करतील,असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
किडंगीपार ते खुर्सीपार रस्ता हा जवरी गावातून जातो. हा रस्ता मागील २० ते २५ वर्षपासून खड्डेमय असून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांनी अनेकदा केली. मात्र त्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गावरील कालव्यावरील पुलाच्या रस्त्यावर खड्डे आहेत. पुलावर मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यामुळे या पुलावर अपघात घडले आहेत. आमगावपासून जवरी ४ किमी चा हा प्रवासच अत्यंत त्रासदायक झाला आहे. प्रथम या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची गरज आहे. गावकऱ्यांना या रस्त्यावरुन ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. किडंगीपार, जवरी, खुर्सीपार, दहेगाव गोंदिया तसेच आमगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना, ग्रामवासीयांना याच रस्त्याने कामावर ये-जा करावी लागते. खड्डेमय रस्ता असल्याने प्रवास खडतर, त्रासदायक असून, अनेकवेळा मोठे अपघात घडले आहे. या रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अनेकदा संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष आहे.
......
तर गावकरी करणार आंदोलन
ग्रामवासीयांनी माजी पंचायत समिती सदस्य छबू उके यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन बांधकाम विभागाला दिले आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास जनआंदोलन पुकारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी जवरी गावातील सरपंच उषा भांडारकर, उपसरपंच बाबूलाल डोये, तंटामुक्ती अध्यक्ष नंदलाल पाथोडे, चंद्रकांता दिवाळे, गीता पाथोडे, शकुंतला गायधने, शालिकराम पाथोडे व ग्रामवासी उपस्थित होते.