रेमडेसिविरची स्वस्ताई केवळ नावालाच! अतिरिक्त दराने विक्री सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST2021-04-21T04:29:23+5:302021-04-21T04:29:23+5:30
गोंदिया : राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ ...

रेमडेसिविरची स्वस्ताई केवळ नावालाच! अतिरिक्त दराने विक्री सुरूच
गोंदिया : राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या मागणीच्या तुुलनेत सध्या रेमडेसिविरचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात त्याची अतिरिक्त दराने विक्री केली जात आहे. शासनाने रेमडेसिविर इंजेक्शनची वाढती मागणी लक्षात घेता या इंजेक्शनच्या किमतीत कपात केली असून, त्याची याच नवीन दराने विक्री करण्याचे आदेश औषध विक्रेत्यांना दिले आहेत. काही विक्रेते शासनाच्या नियमांचे पालन करून ठरावीक दराने विक्री करीत आहेत. मात्र काही जण ग्राहकांच्या अडचणीचा फायदा घेत अतिरिक्त दराने याची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या इंजेक्शनचा काळाबाजार आता रुग्णालयांना पुरवठा केल्या जाणाऱ्या इंजेक्शनमधून होत आहे. गोंदिया येथील विवेकानंद कॉलनी येथील एक रुग्ण नाॅन कोविड रुग्णालयात दाखल आहे. त्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे. नॉन कोविड रुग्णालयांना हे इंजेक्शन देण्यास मनाई करण्यात आली नाही. परंतु या रुग्णाच्या नातेवाइकांनी गरजेपोटी तब्बल १३ हजार रुपयांना रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केले. हे इजेक्शन त्यांना एका खासगी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने उपलब्ध करून दिले. तर काही विक्रेतेसुद्धा वाजवीपेक्षा थोड्या अधिक दराने या इंजेक्शनची विक्री करीत असल्याची ग्राहकांची ओरड आहे.
......
काही मेडिकलमध्ये निर्धारित दरांतच
शहरातील ठोक मेडिकल विक्रेते आणि किरकोळ विक्रेते शासनाने ठरवून दिलेल्या नवीन दरानुसार रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करीत आहेत. हॅटोरो, डॉ. रेड्डीज, ज्युबलियंट या कंपनीचे इंजेक्शन हे शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार विक्री करण्यात येत असल्याचे आढळले.
.......
काही विक्रेत्यांचे दुर्लक्ष
बऱ्याच विक्रेत्यांकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा शिल्लक नाही. सर्वांकडे शासनाने नवीन दर घोषित केल्यानंतर काही प्रमाणात रेमडेसिविरचा स्टाॅक उपलब्ध झाला. त्यामुळे काही जण नियमानुसार विक्री करीत आहेत तर काही जण ग्राहकांच्या अडचणीचा फायदा घेत अतिरिक्त दराने या इंजेक्शनची विक्री करीत आहेत.
.......
अन्न व औषध प्रशासन विभागाची डोळेझाक
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच फायदा काही मेडिकल विक्रेते व काही खासगी रुग्णालये घेत असून, अतिरिक्त दराने या इंजेक्शनची विक्री करीत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
..........
गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पाचशे ते सातशेने वाढत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात ४५९ वर रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
...........
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण :
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण :
व्हेंटिलेटरवर एकूण रुग्ण :
.........