संततधार पावसाने राहते घर जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 06:00 IST2019-09-02T06:00:00+5:302019-09-02T06:00:20+5:30
एैन बैलाच्या पोळ्याच्या दिवशी दुपार पासून अतिवृष्टीचा कहर सुरु झाला. शनिवारी (दि.३१) सकाळपासून ते दुपारपर्यंत धो-धो पावसाच्या सरींनी परिसरासह इंझोरी गावाला झोडपून काढले. दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने इंझोरी येथील रामकृष्ण मेश्राम यांचे राहते घर पूर्णत: कोसळले.

संततधार पावसाने राहते घर जमीनदोस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने परिसराला चांगलेच झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जवळील ग्राम इंझोरी येथील भूमिहिन रामकृष्ण काशिनाथ मेश्राम यांचे राहते घर शनिवारी झालेल्या पावसाने कोसळून जमिनदोस्त झाले. यात त्यांचे कुटुंबच उघड्यावर पडले. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. आर्थिक मदत व निवासाची सोय करण्याची मागणी होत आहे.
एैन बैलाच्या पोळ्याच्या दिवशी दुपार पासून अतिवृष्टीचा कहर सुरु झाला. शनिवारी (दि.३१) सकाळपासून ते दुपारपर्यंत धो-धो पावसाच्या सरींनी परिसरासह इंझोरी गावाला झोडपून काढले. दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने इंझोरी येथील रामकृष्ण मेश्राम यांचे राहते घर पूर्णत: कोसळले. निवास जमिनदोस्त झाल्याने त्यांचा संसार रस्त्यावर आला. घरामध्ये असलेल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यात सापडल्याने मोठी आर्थिक झळ त्यांचेवर पडली.
पत्नी व एक मुलगी असलेले रामकृष्ण भूमिहिन असून मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. ऐन पावसाळ्याच्या दिवसात राहत्या घराची पूर्णत: पडझड होऊन जमिनदोस्त झाल्याने त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. घटनेची माहिती तहसीलदार व खंड विकास अधिकाऱ्यांना देण्यात आली. सध्या कोंडवाड्यात त्यांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबाची वाताहत होऊ न देता त्यांना अन्नधान्यासह आर्थिक मदत करुन निवासाची सोय करुन द्यावी व घरकुलाचा लाभ विनाविलंब देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.