पावसाने मारली दडी
By Admin | Updated: August 31, 2014 23:59 IST2014-08-31T23:59:07+5:302014-08-31T23:59:07+5:30
तिरोडा तालुक्यात खरीप भात पिकाचे क्षेत्र २९८१४.५८ हेक्टर आहे. यात ओलिताचे क्षेत्र २३ हजार ६२५ हेक्टर असून बिनओलिताचे ६०६९.८८ हेक्टर क्षेत्र आहे. पावसाने दडी मारल्याने बिनओलिताखाली

पावसाने मारली दडी
काचेवानी : तिरोडा तालुक्यात खरीप भात पिकाचे क्षेत्र २९८१४.५८ हेक्टर आहे. यात ओलिताचे क्षेत्र २३ हजार ६२५ हेक्टर असून बिनओलिताचे ६०६९.८८ हेक्टर क्षेत्र आहे. पावसाने दडी मारल्याने बिनओलिताखाली असलेले क्षेत्रातील धानपीक पूर्णत: नष्ट होण्याची शक्यता आहे.
खंडित पावसाने बळीराजा आजही घाबरलेला आहे. पंधरा दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही पाऊस न आल्याने शेतात भेगा (फटी) पडायला लागल्या होत्या. आॅगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील धानपिकाला संजीवनी मिळाली आहे. मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच हे वर्ष शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार नाही, अशी भीती त्यांच्यात होती. ती खरी ठरली. तरी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पुन्हा शेतकऱ्यांना उत्साह आला. आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा पावसाने दडी मारली. काही भागात पाऊस आला तर काही भागात काहीच पाऊस नाही. अशास्थितीत धानपिकांचे काय होणार, अशी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
तिरोडा तालुक्यातील तिरोडा, वडेगाव, मुंडीकोटा व ठाणेगाव या महसूल मंडळांतर्गत पावसाचे प्रमाण आजही कमी आहे. अशीच परिस्थिती राहिली तर बिनओलितामध्ये असलेले पीक नाहिसे होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. रोवणीचे काम पूर्ण होईपर्यंत पाऊस बरोबर राहिला. शेतकऱ्यांनी सतत येणारा पाऊस बघत शेतात जमा झालेला पाणी बाहेर काढला. तीनचार दिवसांनी पाऊस पडणे बंद झाले. त्यामुळे बांध्यांतील पाणी आटले आणि जमिनीला भेगा पडू लागल्या. गेल्या आठवड्यात दोन दिवसांच्या पावसाने काहिसा दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा तीच परिस्थिती दोन दिवसांनी येणार आहे. दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर धानपिके पुन्हा धोक्यात येणार आहेत. (वार्ताहर)