मोबाईल सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा, तीन आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 15:22 IST2021-11-18T15:21:38+5:302021-11-18T15:22:10+5:30
काही व्यक्ती मोबाईलवर सट्टयाचे आकडे लिहून पैसे घेऊन हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी छापा टाकत ३ आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून १ लाख ४ हजार ७२५ रुपयांचा माल जप्त केला आहे.

मोबाईल सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा, तीन आरोपी अटकेत
गोंदिया : तिरोडा पोलिसांनी येथील महात्मा फुले वॉर्डात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना अटक केली आहे. बुधवारी (दि.१७) रात्री ९ वाजण्याच्यादरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एक लाख चार हजार ७२५ रुपयांचा माल जप्त केला आहे.
बुधवारी (दि.१७) रात्री ९ वाजण्याच्यादरम्यान ठाणेदार योगेश पारधी व त्यांचे सहकारी शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी महात्मा फुले वॉर्डातील एका घरातील मागील खोलीत काही व्यक्ती मोबाईलवर सट्टयाचे आकडे लिहून पैसे घेऊन हारजीतचा जुगार खेळवित असल्याची माहिती मिळाली. यावर पोलिसांनी तेथे छापा टाकला असता आरोपी संदीप चंदनदास गजभिये (रा. महात्मा फुले वॉर्ड), सुरेश चमरु घोडमारे (रा. संत कवरराम वॉर्ड) व डेव्हिड रविकिरण बडगे (रा. आंबेडकर वॉर्ड) मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याजवळून ४ मोबाईल, २ कॅलक्युलेटर, १ लाकडी टेबल, २ खुर्ची, ५ नग पेन, एक हजार रूपये रोख, दोन दुचाकी व सट्टाच्या आकड्याच्या हिशेबाचे कागद असा एकूण एक लाख चार हजार ७२५ रुपयांचा माल जप्त केला आहे.
या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून आरोपी विरुद्ध कलम महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४, ५ सहकलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पारधी, महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, नायक पोलीस शिपाई श्रीरामे, बर्वे, वाढे, चालक पोलीस शिपाई प्रशांत कहालकर यांनी केली आहे.