रबीसाठी अधिक मिळाले पाणी
By Admin | Updated: June 4, 2015 00:57 IST2015-06-04T00:57:30+5:302015-06-04T00:57:30+5:30
रबी धान पिकाचे उत्पन्न जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात घेण्यात येत आहे. रबी पिकामुळे उत्पन्न चांगले येणार असल्याने शेतकारी आनंदित झाले आहे.

रबीसाठी अधिक मिळाले पाणी
कापणी-मळणी जोमात : चांगले उत्पन्न येण्याचे संकेत
गोंदिया : रबी धान पिकाचे उत्पन्न जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात घेण्यात येत आहे. रबी पिकामुळे उत्पन्न चांगले येणार असल्याने शेतकारी आनंदित झाले आहे. ज्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार नव्हते त्यांनाही पाणी मिळाल्यामुळे शेतकरी आनंदीत झाले आहेत.
बाघ ईटीयाडोह आमगाव व गोंदिया तालुक्यात सिंचनाचे नियोजन करुन ९६० हेक्टर शेतीला पाणी देण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु बाघ ईटियाडोहने दीड हजार हेक्टर शेतीला पाणी दिले. ५४० हेक्टर शेतीत रबी पिकाचे अधिक उत्पादन घेतल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. सालेकसा तालुक्यात २१० हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. बाघ पाटबंधारेच्या पाण्यातून १२०० हेक्टर शेती सिंचनाखाली आणली.
सालेकसा तालुक्यात ९९० हेक्टर शेती अधिक सिंचनाखाली आणण्यात आली. उशिरा लावलेली रबी पिके आठवडाभरात कापून त्यांची मळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व मोठ्या जलाशयांमध्ये मुबलक पाणी असल्यामुळे जणावरांनाही याचा फायदा होत आहे. धरण व तलावांमध्ये काही प्रमाणात पाणी असल्यामुळे मान्सून थोडा लांबला तरी शेतकऱ्यांना चिंता करावी लागणार नाही.
मागील वर्षी पाऊस कमी पडला होता. त्या मानाने जिल्ह्यात रबी पीक जास्त क्षेत्रात घेण्यात आले. यावर्षी सुरवातीला आलेल्या अकाली पावसाने रबी धान पिकाला संजीवनी दिली. परंतु गर्भावस्थेत धान असताना तसेच कापणीवर धान येताच पावसाने झोडपल्यामुळे चांगले उत्पन्न ही आशा उराशी बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली. (तालुका प्रतिनिधी)
अकाली पावसाने झाले नुकसान
अर्जुनी-मोरगाव येथे सोमवारच्या पहाटे झालेल्या पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे धान शेतात पडले आहेत त्यांचे नुकसान झाले आहे. धानाच्या ढिगाऱ्यावरही पाणी गेल्यामुळे तेही धान खराब झाले आहे. १५ दिवसांपूर्वी सडक-अर्जुनी तालुक्यात गारपिटीसह आलेल्या पावसाने धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चांगले उत्पन्न हातात येईल, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावण्याचा प्रयत्न केला. सतत चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याला निसर्गानेही बुचकळ्यात टाकले आहे.
शेतीत महिलांचा पुढाकार
सालेकसा तालुक्यात राज्य सरकारद्वारे संचालित महिला आर्थिक विकास महामंडळाने केंद्राच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची साथ घेऊन सालेकसा तालुक्यात ७७ हेक्टर शेतीत धान पिकाची लागवड केली. या अभियानात २३४ महिलांचा समावेश आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी या २३४ महिलांचे काम पाहून आनंद व्यक्त करीत आहे. आता खरीप पिकासाठी ३०० हेक्टर जमिनीत धान पीक लावले जाणार आहे. यामध्ये ५०० पेक्षा अधिक महिलांना या योजनेने जोडले जाणार आहेत.