५२ हजार हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांचे नियोजन
By Admin | Updated: October 30, 2014 22:54 IST2014-10-30T22:54:13+5:302014-10-30T22:54:13+5:30
गोंदिया जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांनी धानाला प्राधान्य दिले आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात थोडी वाढ होण्याची शक्यता असली तरी

५२ हजार हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांचे नियोजन
गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांनी धानाला प्राधान्य दिले आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात थोडी वाढ होण्याची शक्यता असली तरी पुरेशा पावसाअभावी पिकांची परिस्थिती पाहिजे तशी चांगली नाही.
धानपिकांच्या नुकसानीची कसर भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर आहे. कृषी विभागाने या वर्षासाठी ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रबीच्या हंगामात १७ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पेरणी मात्र जवळपास एक टक्क्यांवर पोहचली आहे. जिल्हा कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी ३४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ९५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली होती. रब्बी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा यासाठी शासनातर्फे अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जात आहे. कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनात भर कशी पडेल? यासाठी प्रयत्न केले जातात.
गहू पिकासाठी तीन हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. हरभरा पिकाच्या लागवडीसाठी नऊ हजार हेक्अर क्षेत्र, जवस पिकासाठी १० हजार हेक्टर क्षेत्र, इतर पिकांसाठी १५ हजार हेक्टर क्षेत्र, भाजीपाला व इतर पिकांसाठी दोन हजार ५०० हेक्टर क्षेत्र तर उन्हाळी भातपिकांसाठी १२ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामातील धानपिक उत्पादनात घट येणार असल्याने शेतकरी रब्बी हंगामाच्या पिकावर आपली गणिते मांडत आहेत. मात्र मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल घडून येत आहे. तर गेल्या चार ते पाच दिवसांपासून वातावरणातील बदलाचा फटका रब्बी पिकांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे धानकापणीला विलंब झाला. मात्र हलक्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी लांबणीवर गेली आहे. यामुळे आतापर्यंत फक्त एक टक्क्यांपर्यंतच पेरणीचे काम पुर्ण झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी नियोजीत वेळेत झाल्यास उत्पादनात वाढ होते अशी शेतकऱ्यांची समज आहे. यामुळे पेरणी वेळेच्या आत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असला तरी जिल्हा कृषी विभागामार्फत देखील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर पुरविण्यात येणारे बियाणे अद्यापही पोचते करण्यात आले नाही.