पदवीधर संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:49+5:302021-02-05T07:47:49+5:30
गोंदिया : जिल्हा परिषद सेवेतील वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना अनुकंपामधून सेवेत आलेल्या व ग्रामपंचायत कर्मचारी यांना शैक्षणिक अर्हतेनुसार जि.प.कडील ...

पदवीधर संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
गोंदिया : जिल्हा परिषद सेवेतील वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना अनुकंपामधून सेवेत आलेल्या व ग्रामपंचायत कर्मचारी यांना शैक्षणिक अर्हतेनुसार जि.प.कडील क संवर्गातील वर्ग ३ च्या सर्व पदांमध्ये १० टक्के याप्रमाणे पदोन्नती समायोजन मिळते. त्याचप्रमाणे सरळसेवेतून आलेल्या वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवक, ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पशुधन पर्यवेक्षक आदी पदांवर पदोन्नती अथवा समायोजन करण्यात यावे, या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली.
५ मे २०१६ च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयान्वये परिचर वर्ग ४ मधून पदोन्नतीने वर्ग ३ लिपिकपदाचा २५ टक्के कोटा ५० टक्के करावा. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने न भरता सरळसेवेने त्वरित भरण्यात याव्या. चतुर्थश्रेणी कर्मचारी वैद्यकीय कारणाने अपात्र ठरलेल्या कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास सेवेत सामावून घ्यावे. पहिल्या कालबद्ध पदोन्नतीमध्ये कनिष्ठ सहायकांची वेतनश्रेणी देण्यात यावी. आरोग्य विभाग चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची २५ टक्के पदे कमी करण्यात येऊ नये. जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षेस बसण्याची परवानगी मिळावी. जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देयक प्रतिपूर्तीऐवजी कार्डलेस अथवा कॅशलेस सुविधा प्रणाली सुरू करावी. जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना धुलाईभत्ता दरमहा ५० रुपये रद्द करून दरमहा ५०० रुपये याप्रमाणे वेतनात पूरकभत्ता म्हणून मंजूर करण्यात यावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन लागू करण्यात यावे, या मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष अतुल मुळे, विष्णू घुगे, गौतम सरकार, पंकज गोरले, राहुल धोटे, संजय वाघमारे, प्रीती दिवाण, रावसाहेब साळुंके, मनीष डोंगरे, राहुल तुरकर उपस्थित होते.