कनिष्ठ व स्थापत्य अभियंता संवर्गातील पदे तातडीने भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST2021-08-25T04:33:46+5:302021-08-25T04:33:46+5:30

गोंदिया : जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गातील मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागा विशेष बाब म्हणून तातडीने भरणेबाबत मागील अनेक वर्षांपासून ...

Promptly fill the posts of Junior and Civil Engineers | कनिष्ठ व स्थापत्य अभियंता संवर्गातील पदे तातडीने भरा

कनिष्ठ व स्थापत्य अभियंता संवर्गातील पदे तातडीने भरा

गोंदिया : जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गातील मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागा विशेष बाब म्हणून तातडीने भरणेबाबत मागील अनेक वर्षांपासून संघटनेमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. याबाबत संघटनेकडून आमदार डॉ. परिणय फुके यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय लावून धरल्यानंतर आता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कनिष्ठ व स्थापत्य अभियंता संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेत अभियंता संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मेगा भरतीमध्ये केवळ आरोग्य विभागातीलच रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद अभियंता संवर्गात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने संघटनेने नुकतेच आमदार डॉ. फुके यांची भेट घेऊन हा विषय निदर्शनास आणून दिला होता. संघटनेची मागणी लक्षात घेता आ. फुके यांच्या नेतृत्वात संघटनेने राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली व त्यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद अभियंत्यांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत विनंती केली होती. फडणवीस यांनी आ. डॉ. फुके यांच्या पत्राची दखल घेत शुक्रवारी (दि. २०) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देत जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गाच्या रिक्त जागा तातडीने भरून जिल्हा परिषदेत एक वीज उपविभाग निर्माण करण्यासंदर्भात मागणी केली आहे. त्यादृष्टीने लवकरच संघटनेच्या मागण्या पूर्ण होतील, अशा अपेक्षा संघटनेचे पदाधिकारी व अभियंता यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Promptly fill the posts of Junior and Civil Engineers