१५० काळविटांचे संवर्धन
By Admin | Updated: October 3, 2016 01:12 IST2016-10-03T01:12:26+5:302016-10-03T01:12:26+5:30
वन्यप्राण्यांत शेड्यूल वन मध्ये मोडणाऱ्या काळविटांची संख्या गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यांत वाढत आहे.

१५० काळविटांचे संवर्धन
संरक्षित क्षेत्राची गरज : माळरान दिले माजी सैनिक व स्वतंत्र संग्राम सैनानींना
नरेश रहिले गोंदिया
वन्यप्राण्यांत शेड्यूल वन मध्ये मोडणाऱ्या काळविटांची संख्या गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यांत वाढत आहे. आमगाव, गोंदिया व गोरेगाव या तीन तालुक्यांच्या मधातल्या भागात वास्तव्यास असलेल्या काळविटची संख्या १५० पेक्षा अधिक आहे. एकीकडे त्यांच्या संवर्धनासाठी वन्यप्रेमींची तळमळ सुरू आहे. मात्र दुसरीकडे काळविटांचे अधिवास असलेले माळरान दिवसेंदिवस कमी होत आहे. या वन्यप्राण्याच्या संरक्षणासाठी ‘माळरान बचाओ’चा नारा सेवा संस्थेने दिला आहे.
वन्य जीवांमध्ये आकर्षित करणारा काळविट प्राणी राज्यात अकोला, अहमदनगर, अमरावती, नागपूर व गोंदिया येथे आहे. राज्यातील गोंदिया जिल्हा हा काळविटसाठी महत्वाचा असून येथील माळरान या प्राण्याला आवडते. मात्र जिल्ह्यातील माळरान नष्ट होत असल्याने मोठ्या संख्येत असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. या काळविटच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता आता भासू लागली आहे.
दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे. ओसाड जंगलाना त्यांचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी जंगलाचे संवर्धन वनविभाग करीत असले तरी याच वनाजवळील माळरानात वावरणाऱ्या काळविट प्राण्यांचा अधिवास संपत चालला आहे. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तो शेताकडे वळत आहे. सन २००४-०५ यावर्षी गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या २० ते २५ च्या दरम्यान होती. परंतु ती संख्या आता १५० ते १८० च्या घरात गेली आहे. या काळविटांची संख्या वाढत असली तरी त्यांना वावरण्यासाठी पुरेसे माळरान नसल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. काळविट संवर्धनासाठी वनविभागाबरोबर निसर्ग मंडळाने उपक्रम सुरू केला होता.
या कार्याला सेवा संस्थेने माळरानावर कुरण निर्माण करण्याचे कार्य केले गेल्याने जिल्ह्यात ५ ठिकाणी काळविटांचा अधिवास टिकून आहे. सध्याचे उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांचे ओसाड झालेल्या माळरानावर कुरण उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याशिवाय त्यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणून बंधारे बनविले, बोअरवेल तयार केले व टाकेही उभारले आहेत. सपाट झालेल्या मैदानावर कुरण तयार करून त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. परंतु हे माळरान गावाच्या अगदी जवळ असल्याने नागरिकांचा डोळा या प्राण्यांवर असतो. काळविटांची वाढती संख्या पाहुन त्यांच्यासाठी पुरेशे माळराण उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा मोर्चा शेताकडेही वळतो. परिणामी शिकार केली जाते.
आधी मोठ्या प्रमाणात काळविटांची शिकार व्हायची. परंतु या संदर्भात वनविभागाने व निसर्ग मंडळाने मागील ७ वर्षापासून केलेल्या मेहनतीमुळे त्यांच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. या कालावधीत केलेल्या मेहनतीमुळे काळविटांचे संवर्धन होत आहे. वनविभागाने या प्राण्यासाठी विशेष निधी उपलब्ध न केल्यामुळे वनविभागालाही त्यांचे संवर्धन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
माळराणाला लागून अनेक गावे असल्याने माळ राणातील हे प्राणी गावात शिरतात किंवा गावातील व्यक्ती त्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी वावरत असल्याने या प्राण्यांना धोका वाटू लागला आहे. आपल्या बचावासाठी सैरावैरा शेताकडे पळणाऱ्या या प्राण्यांची फासे टाकून व वीज लावून शिकार केली जाते.
या काळविट करीता शासनाने माळरान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासनाने माजी सैनिक व स्वातंत्र संग्राम सैनिकांना वनजमीनीचे माळरान शेतीसाठी दिल्यामुळे या काळविटांना धोक्याची घंटा जाणवू लागली आहे. शासनाने माजी सैनिक व स्वातंत्र सैनिकांना दुसऱ्या ठिकाणी जमीनी दिल्यास काळविटांचे संरक्षण होवू शकते. त्यांच्या संवर्धनासाठी मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, मुनेश गौतम, अभिजीत परिहार, शशांक लाडेकर, अंकीत ठाकूर, दुष्यंत आकरे, चेतन जसानी, बबलु चुटे, प्रवीण मेंढे, विवेक खरकाटे काम करीत आहेत.
अपघातांचे प्रमाण झाले कमी
जिल्ह्यात काळविट पाच ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र या पाचही परिसरातून मोठे रस्ते गेल्यामुळे भ्रमण करताना महिन्याकाठी दोन काळविट अपघातात मरण पावत होते. परंतु आता अपघातांचेही प्रमाण कमी झाले आहे. चुलोद, नवरगाव, दतोरा, दागोटोला, तसेच अदासी परिसरापासून ते गोरेगाव तालुक्याच्या काही भागात पसरलेल्या क्षेत्रात काळवीट आढळतात.
ठेवला जातोय वॉच
काळवीट बरोबर कुरणावर वावरणाऱ्या लांडग्यांचीही संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी एकही न दिसणाऱ्या लांडग्यांची संख्या आता बरीच झाली आहे. या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाने वॉच टॉवर उभारले आहे. त्या टॉवर वरून त्यांच्यावर वॉच ठेवला जात आहे.