प्रचार थंडावला, आता घरोघरी भेटीतून संपर्क
By Admin | Updated: July 24, 2015 01:18 IST2015-07-24T01:18:18+5:302015-07-24T01:18:18+5:30
जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी सायंकाळी उमेदवारांचा जाहीर प्रचार थांबला असला तरी ...

प्रचार थंडावला, आता घरोघरी भेटीतून संपर्क
निरीक्षकांकडून पाहणी : भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहन
गोंदिया : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी सायंकाळी उमेदवारांचा जाहीर प्रचार थांबला असला तरी पुढील २४ तासात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांकडून जोर दिला जाणार आहे. दरम्यान निवडणूक निरीक्षकांनी काही तालुक्यांना भेटी देऊन यंत्रणेच्या तयारीची पाहणी केली. सोबतच नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहन केले.
राज्य निवडणूक आयोगाने देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीच्या कामाची पाहणी करण्यासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक सुरेश वानखेडे यांनी आज २२ जुलै रोजी देवरी येथील आयटीआय मधील निवडणुकीची तयारी व मतमोजणी केंद्र असलेल्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संजय नागटिळक उपस्थित होते. निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या सूचना यावेळी वानखेडे यांनी केल्या.
निवडणूक निरीक्षकांनी मतदानासाठी इव्हिएम मशीन तयार करण्याच्या कामाची व स्ट्राँग रूमची पाहणी केली.
देवरी तालुक्यातील २९ ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक व ३ ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीसाठी २५ जुलै रोजी मतदान तर मतमोजणी २७ जुलै रोजी होणार आहे. यासाठी ७४ मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. यावेळी वानखेडे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती जाणून घेतली. तसेच भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक व लेखा पथकाची सुद्धा माहिती जाणून घेतली.
ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निरीक्षक सुरेश वानखेडे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)
नक्षलग्रस्त तालुक्यात दुपारी ३ पर्यंत मतदान
देवरी तालुका नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ अशी राहणार आहे. मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर साहित्यासह घेऊन जाण्यासाठी ८ बसेस व ५ शासकीय वाहन तैनात ठेवण्यात येणार आहेत.
निवडणूक होणाऱ्या ग्राम पंचायतीच्या मतदान केंद्रांपैकी १९ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व ६ मतदान केंद्र संवेदनशिल आहेत. देवरी तालुक्यातील २९ ग्राम पंचायतमधील ८३ उमेदवार अविरोध निवडून आलेत.