केशोरी-वडेगाव (बंध्या) मार्गाची समस्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:19+5:302021-02-05T07:47:19+5:30
केशोरी-वडेगाव (बंध्या) हा जिल्हा मार्ग असून, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या मार्गाने जाण्यासाठी अंतर कमी ...

केशोरी-वडेगाव (बंध्या) मार्गाची समस्या कायम
केशोरी-वडेगाव (बंध्या) हा जिल्हा मार्ग असून, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या मार्गाने जाण्यासाठी अंतर कमी पडत असल्याने चंद्रपूर व गडचिरोली येथे जाण्यासाठी या मार्गाची पसंती जास्त असून, या मार्गाने रात्रंदिवस अवजड वाहनांसह दुचाकी, चारचाकी आणि परिवहन मंडळाच्या ब्रह्मपुरी आगाराच्या बस धावतात. या रस्त्यावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने ठरावासह आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. परंतु, त्या मागणीकडे आ. चंद्रिकापुरे यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी कुंभकर्णी स्वभावातील असल्याचा रोष व्यक्त करून त्यांच्याविरोधात आंदोलन छेडल्याशिवाय उपाय नसल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधीजवळ नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.
या रस्त्यावरून अनेकदा अपघात झाले आहेत. मोठ्या अपघातांची वाट बांधकाम विभाग पाहात तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. या मार्गाची दुरुस्ती करावी म्हणून अनेकदा नागरिकांनी मागणी केली आहे. परंतु, लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. केशोरी-वडेगाव (बंध्या) या रस्त्याकडे जातीने लक्ष देऊन जिल्हा बांधकाम प्रशासनाने या मार्गाची समस्या सोडवावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.