शेतकऱ्यांसह जनावरांवरही संकट
By Admin | Updated: July 16, 2014 00:16 IST2014-07-16T00:16:27+5:302014-07-16T00:16:27+5:30
खरीप हंगामाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी महागडी बियाण्यांची खरेदी करुन पेरणीला सुरुवात केली. मात्र जून महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेसा पाऊस न आल्यामुळे ९० टक्के पेरण्या उन्हाच्या

शेतकऱ्यांसह जनावरांवरही संकट
रावणवाडी : खरीप हंगामाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी महागडी बियाण्यांची खरेदी करुन पेरणीला सुरुवात केली. मात्र जून महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेसा पाऊस न आल्यामुळे ९० टक्के पेरण्या उन्हाच्या दाहकतेने करपून नाहिशा झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह आता पाळीव जनावरेही संकटात सापडली आहेत. काही अल्पशा काळातच जनावरांच्या चारा टंचाईची समस्या गंभीर रुप धारण करण्याचे संकेत दिसत असून बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.
तालुक्यात कोरडवाहू क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने या भागातील शेती निसर्गाच्या पावसावरच अवलंबून असते. यावर्षी अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. मात्र पेरणीचे दिवसही संपत आलेले आहेत. दुबार पेरणीकरिता अंतिम कालावधी १५ जुलै आहे. आता थोडासा पाऊस पडला. परंतु ज्या पेरण्या नष्ट झाल्या त्या काही पुन्हा जगविता येणार नाही. पुन्हा चार-आठ दिवसात पाऊस येणार की नाही याची शाश्वतीसुद्धा नाही. त्यामुळे पेरणी करुनही बियाणे न अंकुरल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यातच अवैध वृक्षतोडीतुळे निसर्ग चांगलाच कोपला आहे. जागोजागी नवीन कंपन्या, गावात टॉवर्स, दररोज नवनवीन पडत असलेली लेआऊट, झपाट्याने वाढत असलेली वाहनांची संख्या, ठिकठिकाणी होणारा सिमेंट काँक्रीटचा वापर या सर्वांचा निसर्गावर विपरीत परिणाम होत आहे. सोबतच निसर्गातही मोठा बदल होत आहे. त्यामुळे जुलैचा अर्धा महिना लोटूनही अद्यापही पुरेशा पावसाचा पत्ता नाही. परिणामी निसर्गच कोपला की काय, अशा चर्चेला गावात व नागरिकांमध्ये उधाण आले आहे.
आधीच कर्जात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी कशी करावी, बी-बियाणे कोठून खरेदी करायचे? त्यासाठी पैशाची पूर्तता कोठून करायची? मुलांचे शिक्षण कसे करायचे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळणे अशक्य झाले आहे. त्यातच वरुण राजा कोपल्याने शेतकऱ्यांच्या उरलेल्या सर्व आशाही मावळल्या आहेत.
वरुणराज्याला प्रसन्न करण्यासाठी ग्रामीण भागात पूजा, यज्ञ, जप सुरु झाले आहेत. मात्र पुरेशा प्रमाणात येत नाही. ज्यावेळी पावसाची गरज होती, त्यावेळी पावसाने दगा दिला. आता रात्रभरापासून रिमझीम पाऊस सुरू आहे. या थोड्याफार पावसाचा कसा उपयोग करता येईल? या विवंचनेत शेतकरी आहे. दुबार पेरणीकरिता बँकेनेही वाढीव पीक कर्ज देण्यास नकार देणे सुरु केले आहे. बळीराजाला सावकाराच्या दारावर जावून उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. त्याचाच लाभ घेत सावकार अव्वाच्या सव्वा अवैधरीत्या व्याज आकारुन शेतकऱ्यांना कर्जाच्या रुपात पैसे देत आहेत. मात्र यात शेतकरी भरडला जात आहे.
मागील चार वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पीक विमा काढला होता. मात्र आजपर्यंत संबंधित विमा कंपनीकडून तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पाठ फिरवली आहे. जनावरांचा चाराही आता संपन्याच्या वाटेवर आहे. पावसाने दडी मारल्याने नवीन चाऱ्याची समस्या उद्भवली आहे. हव्या त्या प्रमाणात पाऊस आला नसल्यामुळे शेतशिवारात हिरवा चाराच उगवला नाही. त्यामुळे जनावरांची भूक कशी भागवावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पूर्वी रानावनात सर्वत्र भरपूर हिरवा चारा असायचा. मात्र सर्वत्र वृक्षतोड होऊन त्या जागेवर सिमेंट काँक्रीटचे बंगले निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे रानावनात हिरवा चारा जनावरांना मिळणे दुरापास्त झाले आहे. हिरव्या चाऱ्याच्या टंचाईचा प्रश्न गंभीर रुप धारण करण्याची चिन्हे आताच दिसत आहेत. पूर्वी गावात जनावरे चारण्यासाठी गायकी असायचा.
आता चारा टंचाईमुळे गावात गायकीही दिसत नाही. चाऱ्याअभावी गुरे कुठे चारावी, असा प्रश्न बळीराजाला सतावत असल्याचे बरेच शेतकरी गुरे पाळण्याचे टाळत आहेत. रोहिणी नक्षत्रापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसोबतच जनावरेही संकटात सापडली आहेत. राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी व महसूल प्रशासन बघ्याची भूमिका निभावत आहेत. अद्यापही नुकसानीचे कोणतेही सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कोण करणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. शेतकरी संकटात असून त्यांची गंभीर समस्या शासनाच्या दरबारी मांडण्यासाठी आता कोण धावून येईल? याची चिंता बळीराजाला सतावत आहे.