खासगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ

By Admin | Updated: June 20, 2017 00:51 IST2017-06-20T00:51:39+5:302017-06-20T00:51:39+5:30

दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात कित्येक खासगी शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे.

Private schools run on schools in schools | खासगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ

खासगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ

एकाही शाळेचा १०० टक्के निकाल नाही : शिक्षणावरील कोट्यवधींचा खर्च पाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात कित्येक खासगी शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. तर दुसरीकडे मात्र पालिकेच्या शाळा १०० टक्के निकालापासून नेहमीप्रमाणे वंचित आहेत. नगर परिषद व शासनाकडून नगर परिषदेच्या शाळांवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र निकालाची ही टक्केवारी बघता कोट्यवधींचा हा खर्च पाण्यात जात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दहावीच्या परीक्षेत एकेवेळी बोर्डाचे टॉपर देणारी नगर परिषदेची म्युनिसिपल हायस्कूल म्हणून ओळखली जात होती. कालांतराने मात्र नगर परिषदेच्या या शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. १०० टक्के तर सोडाच मात्र ९० टक्केच्यावर निकाल देण्यात या शाळा असमर्थ ठरत असल्याची वास्तविकता बघावयास मिळत आहे. हेच कारण आहे की, पालकांचा कल आता खासगी शाळांकडे वाढला असून नगर परिषदेच्या शाळांत आपल्या अपत्यांना टाकण्यास त्यांची अनिच्छा दिसते.
खासगी शाळांतील नाममात्र पगारावर काम करणारे शिक्षक त्यांच्या शाळेचा निकाल १०० टक्के देत आहेत. तर उलट गलेलठ्ठ पगार घेऊनही पालिकेच्या शाळांतील शिक्षक मात्र अपयशी ठरत आहेत. अशात खासगी शाळांतील मोजक्या पगारावर काम करणारे शिक्षक जास्त गुणवंत आहेत, असे आता जनताच बोलत आहे. शासन व पालिकेकडून शाळांवर नाहीतरी कोट्यवधींच्या घरात खर्च केला जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना अन्य सुविधा दिल्या जात आहेत. एवढ्यावरही नगर परिषदेच्या शाळांचा दर्जा काही वाढत नसल्याचे दिसते.
जिल्हा परिषदेच्या शाळांची गत नगर परिषदेच्या शाळांसारखीच होती. जिद्द व चिकाटीमुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगी शाळांना टक्कर देत आहेत. मात्र नगर परिषदेच्या शाळांची स्थिती आहे तीच आहे. पटसंख्या बोटावर मोजण्या एवढीच असून तेवढ्या विद्यार्थ्यांकडूनही पाहिजे तसा निकाल काढण्यात शिक्षक अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशात भविष्यात नगर परिषदेच्या या शाळांचा वाली कोण असा प्रश्न येथे उपस्थित होतो.

बोटावर मोजण्याएवढे विद्यार्थी
नगर परिषद शाळांतील निकालाची ही स्थिती बघता शाळांत शिक्षणाची काय गत आहे हे दिसून येते. तर पटसंख्येची स्थितीही यापासून वेगळी नाही. पालिकेच्या कॉन्व्हेट व प्राथमिक शाळांत तर एक-दोन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय माध्यमिक शाळांतील आकडेवारीही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येवरून दिसून येते. यातून पालिकेच्या शाळांची स्थिती किती गंभीर दिसून येते. पालिकेच्या या स्थितीला नगर परिषद प्रशासन व पदाधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी शाळांवर लगाम कसणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात शाळांत शिक्षक तर राहतील मात्र विद्यार्थी राहणार नाहीत.

मुलींनीच मारली बाजी
नगर परिषदेच्या पाच माध्यमिक शाळा शहरात आहेत. यात येथील एस.एस. गर्ल्स शाळेने सर्वाधिक ९२.६६ टक्के निकाल देऊन बाजी मारली आहे. येथील १०९ मुलींनी परीक्षा दिली होती व त्यात १०१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. शिवाय म्युनिसीपल हायस्कूलमधून ११८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व त्यातील ८६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७२.८८ टक्के निकाल आहे. रामनगर म्युनिसीपल शाळेतून २९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व १० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ३४.४८ टक्के निकाल दिला आहे. म्युनिसीपल हायर शाळेतून १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८९.५१ टक्के निकाल दिला. तर माताटोली शाळेतील ३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व ४०.६७ टक्के निकाल दिला आहे.

Web Title: Private schools run on schools in schools