वन व कृषी पर्यटन विकासाला प्राधान्य
By Admin | Updated: August 3, 2014 00:09 IST2014-08-03T00:09:49+5:302014-08-03T00:09:49+5:30
गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला खूप मोठा वाव असून कृषी व वनपर्यटन विकासाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा नियोजनामध्ये प्राप्त निधी

वन व कृषी पर्यटन विकासाला प्राधान्य
उपमुख्यमंत्र्यांची सूचना : जिल्हा नियोजनाचा निधी वेळेत खर्च करा
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला खूप मोठा वाव असून कृषी व वनपर्यटन विकासाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा नियोजनामध्ये प्राप्त निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अनिल देशमुख, आ.डॉ. खुशाल बोपचे, आ. राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके उपस्थित होते.
समृद्ध वनपरंपरा लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात नागझिरा व नवेगाव अभयारण्य असून या ठिकाणी दरवर्षी ४३ हजार पर्यटक भेट देतात. या अभयारण्याचा विकास करण्यासाठी व कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असून यावर्षी पर्यटन विकास महामंडळाची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. कृषी पर्यटनाला जिल्हा सहकारी बँकेने निधी देण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. पुणे जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्याने कृषी पर्यटन विकसित केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता पाहता जिल्हा नियोजनमध्ये प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सर्वसाधारण, योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व ओटीएसपी या योजनामिळून सन २०१४-१५ साठी १८३ कोटी ८३ लाख ९४ हजार ऐवढी अर्थसंकल्पीय तरतूद आहे. यापैकी ९१ कोटी १ लाख २३ हजार निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून तो वेळेत खर्च करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले.
जिल्ह्यातील खरीपचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यासाठी ४४ हजार ३८० मेट्रीक टन बियाणाचा पुरवठा असून ३४ हजार २२ क्विंटल बियाणे वितरीत करण्यात आले. १० हजार ३५८ क्विंटल बियाणे शिल्लक आहेत. तर जिल्ह्यासाठी ४५ हजार १९४ मेट्रिक टन खताचा कोटा असून त्यापैकी २४ हजार २१० मेट्रीक टन खत शिल्लक आहे.
जिल्ह्यात ४४ हजार ३७० शेतकरी कृषी कर्ज खातेधारक असून ४२ हजार ११ शेतकऱ्यांना खरीप व रबीचे कृषी कर्ज वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात ५ हजार ९६९ शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला असून त्यासाठी १ कोटी १७ लाख ८ हजार प्रिमियम भरले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी दिली.
माजी मालगुजारी तलाव, तेंदूपत्ता व्यवसाय, औद्योगिक संस्था, महाविद्यालय, सिंचन, पर्यटन, जिल्ह्यातील पावसाची स्थिती, मानव विकास मिशन आदी बाबींचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यात ९ हजार वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले असून पट्टेधारकांना रबी पिक घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. माजी मालगुजारी तलावांचे सक्षमीकरण करुन मत्स्व्यवसायास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. धानउत्पादक शेतकऱ्यांचे धान्य साठविण्यासाठी गोदाम उभारण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी घाटे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)