गरजू लाभार्थ्यांचे बँंक खाते उघडण्यास प्राधान्य द्या
By Admin | Updated: August 30, 2014 23:52 IST2014-08-30T23:52:15+5:302014-08-30T23:52:15+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे अनुदान थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने ‘मेरा खाता भाग्यविधाता’ या घोषवाक्याने शुभारंभ होत असलेल्या प्रधानमंत्री जन-धन

गरजू लाभार्थ्यांचे बँंक खाते उघडण्यास प्राधान्य द्या
गोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे अनुदान थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने ‘मेरा खाता भाग्यविधाता’ या घोषवाक्याने शुभारंभ होत असलेल्या प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत गरीब व गरजू लाभार्थिचे खाते उघडण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी आयोजित प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या शुभारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. सैनी म्हणाले, यापूर्वीही जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. बँक खात्याच्या माध्यमातून लाभार्थीला योजनेची रक्कम थेट संबंधितांच्या खात्यात जमा होते ही आनंदाची बाब आहे. बँकांनी जास्तीत जास्त लाभार्थींना खाते उघडण्यासाठी प्रवृत्त करून डेबीट कार्ड देण्याची सुद्धा कारवाई करावी अशी सूचना दिली. तर बॅँक खाते लिंकींग होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात लवकरच १८ बीएसएनएल टॉवर्स उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. कंगाली यांनी, एफआयएफ व एफआयटीएफ अशा दोन भागात ही योजना राबविली जाणार असल्याचे सांगितले.
लखोटे यांनी या योजनेत कुटूंब हा मुख्य घटक असून बँकांना शहरी व ग्रामीण भागात खाते उघडण्याचे नियोजन करून देण्यात आले आहे. खातेदाराला रूपे कार्ड देण्यात येत असून याद्वारे एटीएम प्रमाणे खात्यातून पैसे काढता येणार आहेत. या योजनेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे असे आपल्या प्रास्ताविकात सांगीतले. उपस्थित खातेदारांना एटीएम कार्डसह बँक पुस्तक खाते पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. बँक आॅफ इंडिया यांनी लाभार्थींच्या घरापर्यंत जाऊन आधार कार्ड द्वारे खाते उघडण्याचे तसेच खात्यातून पैसे काढण्याचे प्रात्याक्षिक दिले.
याप्रसंगी आ.राजकुमार बडोले यांच्यासह जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विवेक लखोटे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक मिलींद कं गाली, दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक विजय डहाट, नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या शाखा व्यवस्थापक भावना बिदिचंदानी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक नाथानी व विविध राष्ट्रीय व सहकारी बँकांचे व्यवस्थापक व संबंधित खातेदार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)