विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू असताना विद्युत विभागाने थकीत वीज बिलामुळे शाळांचावीज पुरवठा खंडित करण्याच्या सपाटा लावला आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी विद्यार्थ्यांचे हाल बेहाल होत आहेत. विजेअभावी शाळेतील अनेक उपकरणे बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
सालेकसा तालुक्यात जवळपास दीडशे शाळा असून त्यापैकी ११२ पेक्षा जास्त जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. आतापर्यंत निम्म्या शाळांचा वीज पुरवठा महावितरणे खंडित केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना व दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. अशात वीज पुरवठा खंडित झाल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात होण्याची शक्यता बळावली आहे. विद्याथ्र्याचे हाल बेहाल होताना पाहून शाळेच्या शिक्षकांनी विद्युत विभागाला विनंती केली की किमान परीक्षा संपेपर्यंत तरी विद्युत पुरवठा खंडित करू नये. परंतु महावितरणने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. वीज बिल भरा तरच विद्युत पुरवठा नियमित केला जाईल असे सांगत आहेत. अनेक शाळांमध्ये वीज नसल्याने शाळेतील पाण्याचे पंप सुद्धा बंद पडले आहेत. शाळेत पिण्याचे पाणी, संगणक, प्रोजेक्टर, लाईट, पंखे आदी विजेवर चालणारे उपकरण बंद पडले आहे. विशेष म्हणजे पंखे बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना उकाड्यात बसून परीक्षा द्यावी लागत आहे. तालुक्यातील खोलगड, कुणबीटोला, साखरीटोला, रामाटोला, चिचटोलासह जवळपास ५० शाळांमधील वीज पुरवठा खंडित आला आहे.
सीईओच्या आदेशाला ग्रा.पं.ची केराची टोपलीप्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या महसुलापैकी वीस टक्के रक्कम गावातील शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करायची असते. त्याअंतर्गत प्राथमिक शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतने निधीची तरतूद करणे आवश्यक असते. परंतु बन्ऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पुढे आले.ही बाब लक्षात घेता जून २०२४ मध्ये जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी आदेश काढला आणि गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींना सांगितले की पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. त्यात वीज बिल भरणे, जिथे विद्युत कनेक्शन नाही तिथे कनेक्शन देणे, या बाबींच्या समावेश होता. परंतु याकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष झाले आहे.
"वीज पुरवठा खंडित केल्याने शाळेतील सर्व विजेची उपकरण बंद पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थी निवांत परीक्षा देऊ शकत नाही. विद्युत अभियंता यांना किमान पंधरा दिवस वीज जोडणी करण्यासाठी विनंती केली. परंतु त्यांनी थकीत बिल भरा असे सांगत याकडे दुर्लक्ष केले."- बी.जी. बुलाखे, मुख्याध्यापक, खोलगड