गुंडगिरीविरुद्ध शक्तीप्रदर्शन
By Admin | Updated: May 8, 2016 01:32 IST2016-05-08T01:32:52+5:302016-05-08T01:32:52+5:30
गोंदिया शहरातील वाढत्या गुंडगिरीला लोक किती कंटाळले आहेत आणि त्याबाबत त्यांच्या भावना काय आहेत याचा प्रत्यय शनिवारी शहरात निघालेल्या भव्य मोर्चातून आला.

गुंडगिरीविरुद्ध शक्तीप्रदर्शन
नाऱ्यांनी दणाणले गोंदिया : ये कैसी सरकार है, अपराधो की बहार है...
गोंदिया : गोंदिया शहरातील वाढत्या गुंडगिरीला लोक किती कंटाळले आहेत आणि त्याबाबत त्यांच्या भावना काय आहेत याचा प्रत्यय शनिवारी शहरात निघालेल्या भव्य मोर्चातून आला. तब्बल १० हजारावर नागरिकांनी भर उन्हात मोर्चात सहभागी होऊन आपल्या मनातील चिड व्यक्त केली. यावेळी पोलिसांसोबत सरकारबद्दलही रोष व्यक्त करण्यात आला.
सर्कस मैदानावरून दुपारी २ वाजता हा मोर्चा निघणार होता. त्यामुळे १ वाजतापासून नागरिकांची गर्दी जमत होती. गोंदिया तालुक्याच्या ग्रामीण भागासह जिल्हाभरातील अनेक ठिकाणावरून काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दुपारी ३ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह पिरिपाचे जोगेंद्र कवाडे हेसुद्धा मोर्चात अग्रभागी होते. भर दुपारच्या कडक उन्हात विनातक्रार मोर्चेकरी महिला-पुरूष विविध फलक हाती घेऊन नारेबाजी करीत पुढे पुढे सरकत होते. हाताला, डोक्याला काळ्या फिती लावून मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले नागरिक गोंदियावासियांसाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय होता. वाटेत पडणाऱ्या महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करीत आणि हारार्पण करीत हा मोर्चा मुख्य मार्गाने फिरून दुपारी ४ वाजता स्टेडियम समोरील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचला.
‘ये कैसी सरकार है, अपराधो की बहार है, गुंडागर्दी नही चलेगी नही चलेगी, आरोपी को अरेस्ट करो, अरेस्ट करो, बढती गुंदागर्दी के खिलाफ, हम है विधायकजी के साथ’ अशा विविध घोषणांनी परिसर दणाणू गेला होता.
मोर्चा सभास्थळी पोहोचल्यानंतर सुरूवातीला माजी आ.दिलीप बन्सोड यांना भाषणासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात सध्या राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नाहीत तर सामान्य जनतेचे काय हाल असणार, असा प्रश्न करून सरकारला धारेवर धरले. बंडूभाऊ सावरबांधे यांनी हे मुक्या-बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे सरकार असल्याची टीका केली. आ.राजेंद्र जैन यांनी इतक्या दिवसात आरोपींना पकडू न शकणारे सरकार किती दुर्बल आहे याचा प्रत्यय येत असल्याचे सांगितले. आ.अग्रवाल यांनी आपल्या ४० वर्षाच्या सार्वजनिक जीवनात आणि ५ वेळा आमदार म्हणून राहिलो असताना अशा पद्धतीचे वातावरण कधी पाहिले नसल्याचे ते म्हणाले. हे बिहार-उत्तरप्रदेश नाही, भाजप सरकारने तसे वातावरण इथे करून ठेवले आहे. न.प.मधील भ्रष्टाचाराचे आपण कधीही समर्थन करणार नसल्याचे ठणकावून सांगितले. सभेनंतर उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांना निवेदन दिले. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील युती झाला चर्चेचा विषय
- हा मोर्चा सर्कस मैदानातून निघाल्यानंतर जयस्तंभ चौक, गांधी पुतळा चौक, चांदनी चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक मार्गाने एसडिओ कार्यालयासमोर पोहोचला.
- गांधी पुतळा चौकात महात्मा गांधी, नेहरू पुतळा चौकात पंडित नेहरूंच्या पुतळ्यांना हारार्पण करण्यात आले.
- या सर्वपक्षिय मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषदेतील भाजप-काँग्रेस युतीवर काढलेला चिमटा सभेनंतर चर्चेचा विषय होता. जिल्हा परिषदेत ही युती राहणार की तुटणार यावर चर्चा रंगत होती.
- या मोर्चाची पार्श्वभूमी पाहता मोर्चादरम्यान कोणतीही गडबड होऊ नये म्हणून अभूतपूर्व असा पोलीस बंदोबस्त लावला होता.