पोस्टिंग नवजात शिशू कक्षात काम मात्र दुसरीकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:22+5:302021-01-13T05:16:22+5:30
गोंदिया : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूच्या अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ...

पोस्टिंग नवजात शिशू कक्षात काम मात्र दुसरीकडेच
गोंदिया : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूच्या अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. त्यानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील अनागोंदी कारभार पुढे येत आहे. गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील नवजात शिशूच्या अतिदक्षता कक्षातील अनेक त्रुटी बाहेर येत आहे. या कक्षात नियुक्ती असलेल्या परिचारिका दुसऱ्याच विभागात काम करत असून अनेकांनी या कक्षात ड्युटी नको म्हणून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पत्रसुद्धा दिल्याची माहिती आहे.
नवजात शिशूच्या अतिदक्षता कक्षात दाखल असलेल्या प्रत्येक शिशूमागे एक परिचारिका नियुक्त असण्याचा नियम आहे; पण या नियमांचेसुद्धा पालन बीजीडब्ल्यू रुग्णालयात केले जाते नाही. येथील नवजात शिशू अतिदक्षता कक्षात ३४ शिशू दाखल करण्याची क्षमता असून प्रत्यक्षात या कक्षात बरेचदा ४० ते ५० शिशू दाखल असतात. मात्र, यासाठी केवळ तीन पाळीत १२ परिचारिका कार्यरत आहे. विशेष म्हणजे कक्षात आत २४ तास एकही परिचारिका नसते तर या कक्षाचे बाहेरूनच निरीक्षण केले जाते. या कक्षात ड्युटी करण्याचे काम जिकीरीचे असल्याने येथे ड्युटी करण्यास कुणीही फार इच्छुक नसतात. त्यामुळे ड्युटी टाळण्यासाठी काहीजण मेडिकल लिव्हवर जातात तर कुणी या कक्षात पोस्टिंग झाल्यानंतर ते टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींचे पत्र आणून दुसऱ्याच विभागात काम करत असल्याची माहिती आहे. या कक्षासाठी २२ परिचारिकांचा स्टाफ मंजूर आहे पण प्रत्यक्षात १० ते १२ कार्यरत असल्याची माहिती आहे. नवजात शिशू अतिदक्षता कक्षाच्या आत एकही अग्निशमन यंत्र नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस मोठी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या सर्व प्रकारांकडे रुग्णालय व्यवस्थापनाचे सुद्धा दुर्लक्ष झाले आहे.
....
कक्षाला वरिष्ठांची क्वचितच भेट
बीजीडब्ल्यू रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला जिल्हा शल्यचिकित्सक क्वचितच भेट देतात. शनिवारी भंडारा येथील घटना घडल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी तडकाफडकी भेट देऊन या कक्षाची पाहणी करून तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. मात्र, इतर वरिष्ठ अधिकारी या कक्षाला क्वचितच भेट देत असल्याची माहिती आहे.
.....
अपडाऊनची परंपरा कायम
शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे. त्यातच आकस्मिक सेवा देणाऱ्या आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य असले तरी बहुतेक डॉक्टर आणि कर्मचारी नागपूरवरून अपडाऊन करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस आपत्कालीन स्थितीत समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.....
आता तरी येणार का जाग
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर राज्य शासनाने सर्वच शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाली असून ती वापरण्यास योग्य नसल्याची बाब स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पुढे आली होती. पण अद्यापही हे रुग्णालय त्याच जीर्ण इमारतीत सुरू आहे.