शहरातही मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:52 IST2019-07-16T22:51:49+5:302019-07-16T22:52:21+5:30
जीर्ण इमारत कोसळून ८ ते १० जणांना जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (दि.१६) मुंबई येथे घडली. त्यामुळे जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गोंदिया शहरात सुध्दा १३६ जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातही मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जीर्ण इमारत कोसळून ८ ते १० जणांना जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (दि.१६) मुंबई येथे घडली. त्यामुळे जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गोंदिया शहरात सुध्दा १३६ जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे वेळीच यावर उपाय योजना केली नाही तर शहरातही मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळा लक्षात घेता नगर परिषदेने शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार केली आहे. कर विभागातील मोहरीरे केलेल्या सर्वेक्षणात १३७ इमारती जीर्ण असल्याचे आढळले. या जीर्ण इमारतीच पाडण्याची नोटीस नगर रचना विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र त्यानंतर ठोस कुठलीच कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नगर परिषदेला अपघाताची प्रतीक्षा आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. एखादी इमारत पडून जीवीतहानी झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात व टिव्हीवर बघावयास मिळतात. अशा घटना पावसाळ््यात जास्त प्रमाणात घडतात. शहरातही असे काहीसे प्रकार घडले आहेत. असे प्रकार घडू नये व जीर्ण इमारती पडून कुणाचा जीव जाऊ नये याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर असते. मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेला यासाठी विभाग निहाय पथक तयार करून जीर्ण इमारतींची माहिती संकलीत करावयाची असते. तसेच अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजाविण्याचे, शिवाय गरज पडल्यास धोकादायक बांधकाम पाडण्याची कारवाई करावी लागते.जीर्ण इमारतींचा हा धोका मुख्यत्वे पावसाळ््यात उद्भवत असल्याने शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण केले जाते.विशेष म्हणजे, नगर परिषदेला याचा चांगलाच अनुभव असून नगर परिषदेचा एक जीर्ण भाग यापूर्वी पडला आहे. यातूनच यंदा नगर परिषदेने कर विभागाकडून शहरातील जीर्ण इमारतींची यादी तयार करवून घेतली. त्यानुसार मोहरीरनी शहरातील १३७ जीर्ण इमारतींची यादी तयार करून नगर रचना विभागाला दिली आहे. या यादीच्या आधारे नगर रचना विभागाने संबंधीत मालमत्ता धारकांना नोटीस बजावले आहे. विशेष म्हणजे, जीर्ण इमारत पडून त्यातून काही धोका निर्माण होत असल्यास नगर परिषद मालमत्ताधारकास नोटीस बजावून त्यांना जीर्ण इमारत पाडण्यास सांगते. त्यांच्याकडून इमारत न पाडल्यास नगर परिषद ती जीर्ण इमारत पाडू शकते अशी अधिनियमांत तरतूद असल्याची माहिती आहे.त्यानुसार, नगर परिषदेने या मालमत्ता धारकांना ३१ मे ते १० जून या कालावधीत नोटीस बजावले आहे. आता मात्र नोटीस बजावल्यानंतर काय असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे.
नगर रचनाकारांचे पद रिक्त
नगर परिषदेतील नगर रचनाकारांचे पद रिक्त असून या विभागाचा कारभार तसाच चालत आहे. नगर रचनाकार नकाशे यांची सुमारे दोन वर्षांपूर्वी बदली झाली.त्यांच्या नंतर परदेशी आले व त्यांचीही एक वर्षापूर्वी बदली झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील वऱ्हाडे यांना प्रभार देण्यात आला मात्र आता सुमारे महिनाभरापूर्वी त्यांचीही बदली झाल्याने आता हे पद रिक्त आहे.