कोहळीपार तलावाची पाळ फुटण्याची शक्यता
By Admin | Updated: August 10, 2014 23:05 IST2014-08-10T23:05:16+5:302014-08-10T23:05:16+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील ६५ एकर जमिनीत एक मोठा तलाव आहे. वेस्ट वेअरपासून २५ फुटापर्यंत त्या पाळीला पाण्याने खुरपत नेल्यामुळे तलावाची पाळ फुटून मोठा

कोहळीपार तलावाची पाळ फुटण्याची शक्यता
शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील ६५ एकर जमिनीत एक मोठा तलाव आहे. वेस्ट वेअरपासून २५ फुटापर्यंत त्या पाळीला पाण्याने खुरपत नेल्यामुळे तलावाची पाळ फुटून मोठा घात होण्याची भीती आहे. शेतातील धानपीक तसेच लागून असलेल्या कोयलारी, प्रधानटोला व सालेधाटणी हे गावे पाण्याखाली येण्याची दाट शक्यता असल्यामुळे गावकरी धास्तावले आहेत.
जिल्हा परिषद गोंदिया लघु पाटबंधारे उपविभाग आमगावतर्फे सन १९९४ मध्ये कोहळीपार शिवारात जंगलाला लागून ६५ एकर जमिनीवर या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. कमीत कमी ५०० एकर जमिनीला सिंचनाची सोय होईल, हे उद्दिष्ट होते. कास्तकारांना पाणी पुरवठा करण्यासाठी नहरसुध्दा तयार करण्यात आला आहे. परंतु या विस वर्षाच्या काळात त्या नहराची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे तो बुजला व तलावातील पाणी नहराव्दारे न जाता जवळील कास्तकारांच्या शेतातून वाहते. त्यामुळे धानपिकाचे त्याचप्रमाणे ऊस व तूर यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान होते.
जंगल परिसरात हा तलाव असल्यामुळे पाण्याचा साठा मोठा प्रमाणात होते. त्यामुळे वेस्ट वेअरमधून लवकरच पाणी वाहायला सुरूवात होते. अशातच वेस्ट वेअरपासून २५ फुटापर्यंत पाण्याने तलावाच्या पारीला खुरपत नेले आहे. त्यामुळे केव्हाही पार फुटून मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच तलावाला लागून कोयलारी गावतलाव आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीने त्या तलावाच्या पाळीला मधोमध खड्डा पडून जोरजोराने पाणी वाहत होते. गावकऱ्यांच्या दक्षतेमुळे वेळीच उपाययोजना करण्यात आली व हानी टळली. त्याचप्रमाणे नजीकच असलेल्या पुतळी येथील तलावाची पाळ फुटून शेकडो एकर जमीन पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
याची पुनरावृत्ती होवू नये यासाठी कोयलारी येथील ह.भ.प. बळीराम पाथोडे, टिकाराम बडोले व सरपंच हिरालाल मेश्राम यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने जि.प. पाटबंधारे विभाग गोंदिया, लघु पाटबंधारे उपविभाग आमगाव व तहसीलदार सडक/अर्जुनी यांना लेखी निवेदनातून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. परंतु एकही अधिकारी फिरकला नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित विभागाने पावसाळा संपताच वेस्ट वेअरची जागा बदलावी. त्याचप्रमाणे नहराची (पाटाची) सफाई अविलंब करावी जेणेकरून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत नहराचे पाणी पोहचू शकेल. (वार्ताहर)